श्रीरामपूर शहरात लाकूड तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे वनविभागाने लाकडांनी भरलेली एक संशयास्पद गाडी ताब्यात घेतली. मात्र, या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी पुढे येण्याऐवजी, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीच घटनास्थळावरून पसार झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरिकांमध्ये आणि पत्रकारांमध्येही 'रक्षकच भक्षक' बनले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

​सूतगिरणी फाटा रेल्वे गेटजवळ दुपारी संशयास्पद लाकडांनी भरलेली आयशर क्रमांक MH 04 DK 5945 ही गाडी उभी असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. एस. एस. साखरे, महाराष्ट्र शासन वन विभाग सिंगल स्टार, यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही गाडी ताब्यात घेतली. गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पत्रकारांना मिळाली.


​माहिती मिळताच, स्थानिक पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाईची सखोल माहिती घेण्यासाठी एस. एस. साखरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, पंचनामा करून काही तास घटनास्थळी थांबल्यानंतर, वन अधिकारी आणि वनपाल विठ्ठल सानप यांच्यासह सर्व कर्मचारी गाडीत बसून तिथून गायब झाले. पत्रकारांनी विठ्ठल सानप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन 'नॉट रिचेबल' झाले आणि वनपाल व वनरक्षक यांचेही फोन बंद आले.

​या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत:

​लाकूड तस्कर आणि अधिकारी यांच्यात नेमके काय संबंध आहेत?

​आयशर क्रमांक MH 04 DK 5945 या गाडीवर नेमकी कारवाई झाली की नाही? की ती सोडून देण्यात आली?

​वनविभागाचे अधिकारी माहिती देण्याऐवजी का पसार झाले?

​यापूर्वीही गोकुळ लबडे यांच्याशी संबंधित अशाच एका कारवाईमध्ये हीच आयशर क्रमांक MH 04 DK 5945 ही गाडी आणि हेच अधिकारी होते असे तिरंगा न्यूजच्या व वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे समजते. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती आणि आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

​या सर्व प्रकारामुळे "वन विभागाचे चालले तरी काय? घडले तरी काय? चालते तरी काय?" असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी कारवाई करतील की त्यात सामील होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.