शाहिद हाफिज शेख यांचे १४ वर्षांच्या संघर्षानंतर निधन,शेख परिवारासह मित्रपरिवारावर शोककळा;
संगमनेर प्रति: दि.19 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री गणी हाजी शेख यांचे भाचे तसेच माजी उपनगराध्यक्ष इम्रान गणी शेख व माजी नगरसेवक नुरमहंमद पिरमहंमद शेख यांचे आत्तेभाऊ,सर्वांचे लाडके आणि आधार' म्हणून ओळखले जाणारे शाहिद हाफिज शेख यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. जीवघेण्या आजारासोबत तब्बल 14 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या तरुण वयात काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतल्याने केवळ संगमनेर शहरावरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शाहिद हाफिज शेख यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या कामातून एक अशी ओळख निर्माण केली होती की, ते कोणत्याही एका विशिष्ट गटाचे नव्हते, तर संपूर्ण समाजाचे नेतेच होते. राजकीय क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांसाठी काम केले.त्यांचे सर्वात मोठे योगदान हे सामाजिक क्षेत्रात होते. त्यांनी गरजू आणि निराधार लोकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संगमनेर शहरात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त झाली. अनेकांना धक्का बसला आणि शहरावर जणू शोक कळा पसरली. एकूणच सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या तोंडून एकच चर्चा सुरू होती,
ती म्हणजे "घरचा नव्हे तर गावाचा कर्ता हरपला आहे. शाहिद भाई' किंवा 'शाहिद भाऊ' म्हणून ते अत्यंत लोकप्रिय होते. लोक त्यांना आपला 'दाता आणि कर्ता मानत असत. 'ज्याला आधार नाही त्याला शाहीदचा मोठा आधार होता', अशा शब्दांत अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत होते.शाहिद शेख यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील पोकळी स्पष्ट जाणवत आहे. सामाजिक असो वा राजकीय, सर्वच स्तरांतील नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक सलोख्यासाठी झटणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. शाहिद शेख यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची 14 वर्षे एका मोठ्या आजारपणासोबत संघर्ष केला. प्रकृतीची साथ नसतानाही त्यांनी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य कधी सोडले नाही. त्यांच्या या प्रदीर्घ संघर्षाची कहाणी सर्वांसाठी हृदयद्रावक ठरली आहे.
------------------💐---------------------💐---------------------
शाहिद हाफिज शेख यांना संगमनेरकरांकडून आणि तमाम स्नेह्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
------------------💐---------------------💐---------------------
✍️ कार्यकारी संपादक: शौकत पठाण
Post a Comment