संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवर 'सर्जिकल स्ट्राईक'! नवीन कायद्याचे 'कलम १११' अस्त्र; दरोडेखोरांची जन्मठेपेच्या दिशेने रवानगी
आरोपींना आता वर्षभर जामीन नाही; मोक्कासारख्या कडक कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ ;
संगमनेर प्रति : दि 6 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील 'ब्रह्मास्त्रा'चा वापर सुरू केला आहे. कोल्हेवाडी रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी केवळ दरोड्याचा गुन्हा दाखल न करता, त्यात कलम १११ (संघटित गुन्हेगारी) ची वाढीव तरतूद केली आहे. या कारवाईमुळे आरोपींना आता किमान एक वर्ष जामीन मिळणे दुरापास्त झाले असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
------------------नेमकी कारवाई काय?--------------- दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना, कोल्हेवाडी रोडवर काही इसम अंधाराचा फायदा घेऊन शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ मोटारसायकल, ३ मोबाईल, कोयते, कुऱ्हाड, मिरची पूड आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती.
हे आहेत अटकेतील 'भाई'
१. अलिम अकबर पठाण (वय २४, रा. जमजम कॉलनी) - याच्यावर यापूर्वी तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २. वसीम मन्सूर शेख (वय ३८, रा. मदिनानगर). ३. निलेश बाळासाहेब शेळके (वय ४०, रा. वाघापूर). ४. सलमान अकबर पठाण (वय २४, रा. कोल्हेवाडी). ५. अनमोल कुरनवाश चव्हाण (वय १९, रा. घुलेवाडी). ६. सलीम अकबर पठाण (वय २६, रा. जमजम कॉलनी) - याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. ----------- काय आहे कलम १११ चे महत्त्व? ----------- नवीन कायद्यातील कलम १११ हे विशेषतः संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमात मोक्का कायद्याप्रमाणेच कडक शिक्षेची तरतूद असून गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.हे कलम लावले नसते तर आरोपी ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर आले असते, मात्र आता किमान १ वर्ष त्यांना तुरुंगातच राहावे लागेल. विशेष म्हणजे आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा अधिक गुन्हे केल्याने अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांनी या कलमाच्या वापरासाठी विशेष परवानगी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. समीर बारवकर, पोसई पगारे व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. नवीन कायद्याची ही प्रभावी अंमलबजावणी संगमनेरमधील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.
------------------------- चौकट ------------------- अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे मागील दहा वर्षात गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांचा एकत्रित क्राईम डाटाबेस ( crime data base) तयार करण्यात आलेला आहे. व तो सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे.या क्राईम डाटाबेसमुळे दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित झाली आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्यावर मोकासारखी कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील एक अंमलदार फक्त या कामासाठी नेमण्यात आलेला आहे. सदरचा अंमलदार दररोज दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यातील गुन्हेगारावर पूर्वीचे गुन्हे असतील तर त्या गुन्हेगारावर व त्याच्यासोबत गुन्हा करणाऱ्या अन्य गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहितेतील कलम 111 चा वापर करता येईल का? याचा आढावा घेतला जातो.चालू वर्षात आत्तापर्यंत उत्तर नगर जिल्ह्यातील चार गुन्ह्यांना सदरहू कलमान्वये कारवाई केली आहे " अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे विभाग श्रीरामपूर -----------------------------------------------------
Post a Comment