४० वर्षे सत्तेचा मलिदा खाल्ला, मग पोलिसांचा वनवास का संपवला नाही? आमदार अमोल खताळांचा थोरात-तांबेंना बोचरा सवाल
श्रेय लाटणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं’; पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर खताळांचा थेट प्रहार ;
संगमनेर प्रति : दि 5 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, जे चाळीस वर्षे फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात व्यस्त होते आणि जे फक्त पदवीधर आमदार बनून मिरवत होते, त्यांना आपल्याच मतदारसंघातील पोलिसांचे प्रश्न सोडवायला वेळ का मिळाला नाही? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावे आणि मगच श्रेय लाटायला पुढे यावे," अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला. संगमनेर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सुरू झालेल्या श्रेयवादाच्या लढाईत खताळांनी विरोधकांचा अक्षरशः धुराळा उडवला आहे.
--------------- पोलीस वसाहत की 'नरकवास '?-------- आमदार खताळ यांनी पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेवर भाष्य करताना विरोधकांच्या ४० वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, १९६० च्या दशकातील या इमारती आता 'मृत्यूचा सापळा' बनल्या आहेत. पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, नादुरुस्त गटारी आणि शौचालयांचे चेंबर यांमुळे पोलीस बांधव नरकयातना भोगत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारती राहण्यास अयोग्य ठरवूनही वर्षानुवर्षे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ------- खताळांचा 'अधिवेशनातील' तो कडाका! ------- हा प्रश्न सुटावा यासाठी आमदार खताळ यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता थेट विधानसभेत आवाज उठवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज ही वसाहत अंतिम टप्प्यात आली आहे. जुन्या आणि धोकादायक इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी आता अद्ययावत, सुरक्षित आणि हायटेक पोलीस टॉवर्स उभे राहणार आहेत.
------------- श्रेय लाटणाऱ्यांना लगावला टोला ------------ प्रशासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होताच काही मंडळींनी सोशल मीडिया आणि फलकबाजीच्या माध्यमातून या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावर कडाडून टीका करताना खताळ म्हणाले, "जनतेला सर्व ठाऊक आहे. हा प्रश्न कोणी विधानसभेत लावून धरला आणि कोणी मुख्यमंत्र्यांच्या दालनातून फाईल मंजूर करून आणली, हे लपून राहिलेले नाही. काम पूर्ण होताना पाहून काहींची धडपड सुरू झाली आहे, पण जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत."
-------- पुढील संकल्प: अधिकाऱ्यांचेही प्रश्न सुटणार----- केवळ कर्मचाऱ्यांचेच नाही, तर संगमनेरमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी नियुक्त अधिकाऱ्यांना स्वतंत्र आणि भव्य निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा मानसही आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे. त्याचाही पाठपुरावा सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
------------------------- चौकट ---------------------- थोरात-तांबेंच्या ४० वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळावर जोरदार प्रहार.तर पदवीधर आमदार म्हणून मिरवणाऱ्यांना या आगोदर पोलिसांचे प्रश्न का दिसले नाहीत? मात्र आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि विखे पाटलांच्या मदतीने वसाहतीचा प्रश्न कायमचा सुटणार. श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्यांना आरसा दाखवण्याचे काम खताळांनी केले. आमदार खताळ यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस बांधवांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.
Post a Comment