April 2026

आमदार खताळांकडून 'एजंटगिरी'चा पर्दाफाश शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार;


संगमनेर प्रती: दि १५ एप्रिल २०२६ मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन 'एजंटगिरी'चा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून, ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हाट्सअपद्वारे माहिती दिली. विशेष म्हणजे, या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मन्सूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता, “मी मन्सूर शेख यांचा जावई आहे,” असे उत्तर देण्यात आले. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब विचारला. त्यावर “तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो,” असे उत्तर देण्यात आले.या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तत्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना पुढे त्याठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


-------------------------
चौकट -----------------------
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर त्या मागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली.कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, “आपला माणूस” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.आमदार अमोल खताळ पा.

--------------------------------------------------------------

संगमनेरच्या वसीम मनियार यांचे 'CTET' परीक्षेत देदीप्यमान यश,वसीम मनियार यांचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी;


​संगमनेर प्रती: दि ९ एप्रिल२०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोडीला जर चिकाटी असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते," हे संगमनेरच्या वसीम मनियार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बहुजन शिक्षण संघाच्या सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वसीम यांनी साल २०२६ च्या CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात १५० पैकी १२१ गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे.

​----------- संघर्षातून फुलले यशाचे कमळ --------------
वसीम मनियार यांचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी ते दिवसभर बांगड्यांचे दुकान चालवतात. पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसल्यानंतर, संध्याकाळच्या वेळी ते सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून आपली सेवा बजावतात. इतकेच नव्हे तर, 'मासूम' संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून ते याच विद्यालयात सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक म्हणूनही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
​घरची जबाबदारी, बांगड्यांचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून रात्रीच्या वेळी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीने 'रात्रीच्या शाळे'चा प्रकाश खऱ्या अर्थाने उजळून निघाला आहे.
​-----------
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव ------------
वसीम यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. त्यांच्या या जिद्दीची दखल घेत निकिता केतकर आणि शशिकांत गवस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त संघराज रूपवते, अध्यक्ष बी.आर. कदम, विश्वस्त उत्कर्षा रूपवते, सचिव मिलिंद गायकवाड आणि मुख्याध्यापक विकास जगताप यांनी वसीम यांच्या यशाचा गौरव केला. यासोबतच मुंबई पोलीस दलाचे माजी निरीक्षक सय्यद दिलावर, अंजुमन इस्लाम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल्ला चौधरी, जे.यु.सी. चे अध्यक्ष इदरीस भाई शेख आणि आसिफ अली सय्यद यांनीही वसीम मनियार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
​वसीम मनियार यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक मिसाल (आदर्श) ठरले आहे. एवढं मात्र नक्की....
(नवमूल्य महाराष्ट्र वृत्तसंस्था संगमनेर)

संगमनेरकरांनी निवडले अश्वारूढ स्मारक,नगरपालिका सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर ;


संगमनेर प्रती: दि.१४ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारकाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून संगमनेरकरांनी पूर्णाकृती अश्वारूढ स्मारकाला स्पष्ट पसंती दिली आहे. शहरात शिवस्मारक उभारण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत नगरपालिकेकडे जागा वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने संगमनेर बस स्थानकासमोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली.मात्र या स्मारकाच्या जागेच्या लढ्याची सुरुवात यापूर्वीच झाली होती. २०१८ साली तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात बस स्थानक परिसरातील जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी नगरपालिकेने मागणी केली. त्यानंतर महसूलमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात पुढे नेला. मात्र एसटी महामंडळाच्या धोरणामुळे राज्यातील एसटी आवारात स्मारकास मनाई असल्याने हा विषय दीर्घकाळ प्रलंबित राहिला. यानंतर २०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर त्यांनी हा विषय पुन्हा मार्गी लावण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून निर्णय व्हावा यासाठी आग्रह धरला आणि अखेर स्मारकासाठी जागा उपलब्ध झाली. जागा उपलब्ध झाल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ५ ते ७ मार्च दरम्यान नागरिकांमधून “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कसे असावे?” याबाबत मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला.

काल जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार पूर्णाकृती अश्वारूढ स्मारकाला सर्वाधिक ६,५६४ मते मिळाली. उभ्या स्मारकाला ४,७६१ मते, तर सिंहासनाधीश्वर स्मारकाला ७६१ मते मिळाली. एकूण १२,०८६ नागरिकांनी मतदान केले.या निकालानुसार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अश्वारूढ स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून शहरात लवकरच भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या मदतीसह लोकसहभागातून स्मारक उभारणार - आ.तांबे
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या खर्चासाठी शासनाच्या विविध योजनांमधून मदत घेणार आहे तसेच लोकसहभागातून देखील स्मारक उभे करणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले. ----------------------------------------------------

----------- एकनाथजी शिंदे यांचे विशेष आभार ----------
संगमनेरच्या जनभावनांचा आदर ठेवत विशेष बाब म्हणून स्मारकासाठी जागा वर्ग करण्यास मान्यता दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील समस्त संगमनेरकरांनी आभार मानले.

सुरक्षेच्या नावाखाली 'हप्ता' वसुलीचा गोरखधंदा? रक्षक दल नेमकं रक्षण कोणाचं करतंय? सौदागर ;


​संगमनेर (प्रति.रफिक सौदागर) दि ६ एप्रिल२०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार,संगमनेर शहरात सुरक्षितता राहावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेले नगरपालिका 'रक्षक दल' सध्या आपल्या मूळ कर्तव्यापेक्षा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहे. शहरात सुरक्षितता राखण्याऐवजी हे रक्षक दुकानदारांकडून हप्ते वसुली आणि आरोपींशी तडजोडी करण्यातच धन्यता मानत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
​५०० रुपये द्या आणि रात्रभर दुकान चालू ठेवा!
​शहरात रात्री १० वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे नियम असताना, रक्षक दलाचे काही कर्मचारी दुकानदारांना "५०० रुपये द्या आणि रात्रभर दुकान चालू ठेवा" असे उघड आश्वासन देत असल्याची चर्चा व्यापारी वर्गात रंगली आहे. रक्षक दल ही काही पोलीस यंत्रणा नाही, मात्र पालिकेच्या अधिकाराचा गैरवापर करत ही वसुली सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत
.            आरोपींशी 'सेटलमेंट' करण्यात रक्षकच पुढे?

एखादी घटना घडल्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी, हे रक्षकच स्वतः पुढाकार घेऊन तडजोड (सेटलमेंट) घडवून आणत असल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना सोडून देण्याचे प्रकार घडत असतील, तर शहराच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

​                रक्षक दल नेमकं रक्षण कोणाचं करतंय?
​शहरातील अवैध धंदे, रात्रीची गस्त आणि शिस्त राखण्यासाठी हे दल असणे अपेक्षित होते. मात्र, रक्षकच जर भक्षक बनून हप्ते वसुलीत गुंतले असतील, तर हे दल नेमके कोणाच्या फायद्यासाठी आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या प्रतिमेला तडा जात असून, रक्षक दलाच्या या 'भोंगळ' कारभारावर वरिष्ठ अधिकारी लगाम लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

------------------------- चौकट ------------------------

​"रक्षक दलाच्या माध्यमातून शहरात सुरक्षितता राहणे अपेक्षित होते. मात्र, जर हप्ते वसुली आणि तडजोडीच्या चर्चा खऱ्या असतील, तर हा गंभीर प्रकार आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन दोषींवर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे." जिल्हा प्रतिनिधी रफिक सौदागर-

-----------------------------------------------------------

कराचा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरा! शिवसेना नगरसेविका सौ. साक्षी सूर्यवंशी ;


संगमनेर प्रती:  दि.१ एप्रिल २०२६ राज्यातील महायुती सरकारने ५० टक्के शास्ती माफीसाठी महत्वपूर्ण ऐतिहासिक 'अभय योजना' लागू केली. यासाठी आ. अमोल खताळ यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळेच शहरातील नागरीकांना मोठा फायदा होत आहे. तसेच संगमनेर नगरपालिकेला कर वसुलीच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. पालिका प्रशासनाकडून या निधीचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी करण्यात यावा अशी अपेक्षा शिवसेना नगरसेविका सौ. साक्षी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.अर्थिक वर्ष अखेरीस कर वसुलीसाठी नागरीकांनी केलेले सहकार्य विचारात घेता महायुती सरकाने घेतलेल्या शास्ती माफीचा सकारात्मक परिणाम असल्याचे सांगून नगरसेविका सौ. सूर्यवंशी म्हणाल्या की, आ. अमोल खताळ यांनी नागरीकांना शास्ती माफीचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची व्यक्तिगत भेट देवून शास्ती माफीचा निर्णय लागू व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले. यामुळे वर्षानुवर्ष नागरीकांवर असलेला कराचा बोजा कमी झाला. पालिका प्रशासनाला वसुलीस नागरिकांनी मोठे सहकार्य केल्याचे नगरसेविका सौ. सूर्यवंशी यांनी सांगितले. पालिकेच्या तिजोरीत कराच्या रूपाने जमा झालेला निधी विकास कामासाठी असून पालिका प्रशासनाने यामाध्यामतून शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याची मागणी सौ.सूर्यवंशी यांनी केली आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला निधीची उपलब्धता होत आहे. शहराच्या विकासात महायुती कुठेही कमी पडणार नाही आशी ग्वाही देवून नागरीकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी महायुती म्हणून पालिकेत सक्रीयपणे भूमिका बजावणार असल्याचेही यांनी सौ.सूर्यवंशी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget