जिद्दीला सलाम! दिवसा बांगड्यांचे दुकान, रात्री शाळा आणि अभ्यासाचा ध्यास;
संगमनेरच्या वसीम मनियार यांचे 'CTET' परीक्षेत देदीप्यमान यश,वसीम मनियार यांचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी;
संगमनेर प्रती: दि ९ एप्रिल२०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोडीला जर चिकाटी असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते," हे संगमनेरच्या वसीम मनियार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बहुजन शिक्षण संघाच्या सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वसीम यांनी साल २०२६ च्या CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात १५० पैकी १२१ गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे.
----------- संघर्षातून फुलले यशाचे कमळ -------------- वसीम मनियार यांचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी ते दिवसभर बांगड्यांचे दुकान चालवतात. पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसल्यानंतर, संध्याकाळच्या वेळी ते सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून आपली सेवा बजावतात. इतकेच नव्हे तर, 'मासूम' संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून ते याच विद्यालयात सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक म्हणूनही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. घरची जबाबदारी, बांगड्यांचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून रात्रीच्या वेळी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीने 'रात्रीच्या शाळे'चा प्रकाश खऱ्या अर्थाने उजळून निघाला आहे. ----------- सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव ------------ वसीम यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. त्यांच्या या जिद्दीची दखल घेत निकिता केतकर आणि शशिकांत गवस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त संघराज रूपवते, अध्यक्ष बी.आर. कदम, विश्वस्त उत्कर्षा रूपवते, सचिव मिलिंद गायकवाड आणि मुख्याध्यापक विकास जगताप यांनी वसीम यांच्या यशाचा गौरव केला. यासोबतच मुंबई पोलीस दलाचे माजी निरीक्षक सय्यद दिलावर, अंजुमन इस्लाम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल्ला चौधरी, जे.यु.सी. चे अध्यक्ष इदरीस भाई शेख आणि आसिफ अली सय्यद यांनीही वसीम मनियार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वसीम मनियार यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक मिसाल (आदर्श) ठरले आहे. एवढं मात्र नक्की.... (नवमूल्य महाराष्ट्र वृत्तसंस्था संगमनेर)
Post a Comment