सुरक्षेच्या नावाखाली 'हप्ता' वसुलीचा गोरखधंदा? रक्षक दल नेमकं रक्षण कोणाचं करतंय? सौदागर ;
संगमनेर (प्रति.रफिक सौदागर) दि ६ एप्रिल२०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार,संगमनेर शहरात सुरक्षितता राहावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्थापन करण्यात आलेले नगरपालिका 'रक्षक दल' सध्या आपल्या मूळ कर्तव्यापेक्षा वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहे. शहरात सुरक्षितता राखण्याऐवजी हे रक्षक दुकानदारांकडून हप्ते वसुली आणि आरोपींशी तडजोडी करण्यातच धन्यता मानत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. ५०० रुपये द्या आणि रात्रभर दुकान चालू ठेवा! शहरात रात्री १० वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे नियम असताना, रक्षक दलाचे काही कर्मचारी दुकानदारांना "५०० रुपये द्या आणि रात्रभर दुकान चालू ठेवा" असे उघड आश्वासन देत असल्याची चर्चा व्यापारी वर्गात रंगली आहे. रक्षक दल ही काही पोलीस यंत्रणा नाही, मात्र पालिकेच्या अधिकाराचा गैरवापर करत ही वसुली सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.आरोपींशी 'सेटलमेंट' करण्यात रक्षकच पुढे?
एखादी घटना घडल्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी, हे रक्षकच स्वतः पुढाकार घेऊन तडजोड (सेटलमेंट) घडवून आणत असल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना सोडून देण्याचे प्रकार घडत असतील, तर शहराच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
रक्षक दल नेमकं रक्षण कोणाचं करतंय? शहरातील अवैध धंदे, रात्रीची गस्त आणि शिस्त राखण्यासाठी हे दल असणे अपेक्षित होते. मात्र, रक्षकच जर भक्षक बनून हप्ते वसुलीत गुंतले असतील, तर हे दल नेमके कोणाच्या फायद्यासाठी आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या प्रतिमेला तडा जात असून, रक्षक दलाच्या या 'भोंगळ' कारभारावर वरिष्ठ अधिकारी लगाम लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ------------------------- चौकट ------------------------
"रक्षक दलाच्या माध्यमातून शहरात सुरक्षितता राहणे अपेक्षित होते. मात्र, जर हप्ते वसुली आणि तडजोडीच्या चर्चा खऱ्या असतील, तर हा गंभीर प्रकार आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन दोषींवर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे." जिल्हा प्रतिनिधी रफिक सौदागर-
Post a Comment