संगमनेर पालिका निवडणुकीत,आरक्षणाचा बॉम्ब. अनेक दिग्गजांचे राजकीय भविष्य धोक्यात,
ओबीसी' उमेदवारांचा शोध सुरू? आरक्षण सोडतीमुळे शहराच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप,आरक्षणामुळे पत्ता कट;
संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीमुळे शहराच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला आहे. विशेषतः ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाचा 'खोडा' अनेक दिग्गज स्थानिक नेत्यांना बसला असून, त्यांच्या वर्षानुवर्षाच्या राजकीय तयारीवर पाणी फेरले गेले आहे. प्रांताधिकारी कार्यालय येथे मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सोडतीमध्ये अनेक प्रभागांमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले. या आरक्षणामुळे ज्या प्रभागांमध्ये ओबीसी मतदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे, तेथे आता ओबीसी उमेदवार मिळवण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. उमेदवार तर सोडाच, पण या अचानक आलेल्या आरक्षणामुळे मतदारांमध्येही तीव्र नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.
आरक्षणामुळे पत्ता कट झालेले दिग्गज या आरक्षणामुळे थेट फटका बसलेल्यांमध्ये विद्यमान आणि इच्छूक अशा स्थानिक वजनदार नगरसेवकांचा समावेश आहे. गेली कित्येक वर्षे ज्या प्रभागांवर काही नेत्यांनी आपला अबाधित प्रभाव आणि जनसंपर्क टिकवून ठेवला होता, ते प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे
ज्या प्रभागांमध्ये विशिष्ट पक्षाचे किंवा कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे वर्चस्व होते, त्या हक्काच्या जागा आरक्षित झाल्याने आता त्यांच्या राजकीय वारसदारांना नवा प्रभाग शोधावा लागत आहे. अनेक ठिकाणी आरक्षित जागेवर उभा राहण्यासाठी ओबीसी उमेदवारच उपलब्ध नाहीत, किंवा असले तरी त्यांचा त्या प्रभागात कोणताही जनसंपर्क नाही. यामुळे मतदारांना आपल्या ओळखीचा आणि प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उमेदवार आयातीची' वेळ आरक्षणामुळे निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीमुळे अनेक प्रभावी स्थानिक नेत्यांना आता उमेदवार 'आयात' करण्याची नामुष्की ओढवली आहे. ज्या प्रभागात ओबीसी मतदारांची संख्या कमी असूनही जागा आरक्षित झाली आहे, तेथे पक्षांना दुसऱ्या प्रभागातील, किंवा फारसा राजकीय अनुभव नसलेल्या नवीन ओबीसी चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. ही परिस्थिती पाहता, निवडणुकीत पक्षांची सर्वात मोठी डोकेदुखी उमेदवारांचा शोध आणि त्यांची जुळवाजुळव करणे हीच असेल.
राजकीय समीकरणे बदलणार एकीकडे अनेक दिग्गज नेत्यांना आपला हक्काचा प्रभाग सोडावा लागणार आहे, तर दुसरीकडे ज्या प्रभागांमध्ये ओबीसींची संख्या चांगली आहे, तेथे मात्र इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. परिणामी, संगमनेर नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभागांची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच काय तर संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतील हा 'आरक्षण बॉम्ब' स्थानिक राजकारणाची दिशा निश्चितच बदलणार असून, ओबीसी उमेदवारांचा प्रभावी शोध आणि बंडखोरी रोखणे हेच स्थानिक नेत्यांपुढील मोठे आव्हान असणार आहे. या राजकीय पेचप्रसंगावर मात करण्यासाठी संगमनेरचे स्थानिक नेतृत्व नेमकी कोणती रणनीती आखते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Post a Comment