या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्य काय, या मोहिमेत पोलिसांनी किती मुलांना घेतले ताब्यात,वाचा सविस्तर बातमी;
शिर्डी प्रति: दि 12 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शिर्डीमध्ये भीक मागणाऱ्या आणि भाविकांना त्रास देणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून, या मुलांना अशा कामांमध्ये गुंतवणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील या विशेष मोहिमेत १२ मुलांची सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. शिर्डी मंदिर परिसरात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नेमकी कारवाई काय?
शिर्डीतील साई मंदिर परिसरात अनेक लहान मुले भीक मागताना, तसेच हार, फुले आणि फोटो विकताना आढळून येतात. काही मुले नशेच्या आहारी गेल्याने भाविकांना त्रास देत असल्याच्याही तक्रारी होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. या मोहिमेत पोलिसांनी १२ मुलांना ताब्यात घेतले. त्यांचे जबाब नोंदवून त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार, या मुलांना संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पालकांवरही गुन्हा दाखल
या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ मुलांची सुटका करून कारवाई थांबली नाही. मुलांना भीक मागण्यास आणि इतर वस्तू विकण्यास भाग पाडून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आणणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या १२ मुलांच्या १२ पालकांविरुद्ध बाल न्याय अधिनियम कलम ७५ आणि ७६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत आणि पालकांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल
गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत अल्पवयीन मुलांकडून लहान-मोठे गुन्हे घडत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे देशा-परदेशातून येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भाविकांचे शिर्डीतील आगमन, वास्तव्य आणि परतीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहतील, असे संकेतही वाघचौरे यांनी दिले आहेत.
Post a Comment