संगमनेर प्रति:दि 28 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावावर आज निसर्गाने अक्षरशः सूड उगवला आहे, ढगफुटीसदृश्य पावसाने आलेल्या महापुराने संपूर्ण गावाला वेढले, आणि त्यात बोरसे वस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालेलं पाहून इथल्या मायबाप नागरिकांच्या काळजाला पीळ पडला आहे. शेकडो कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून मदतीची गरज असताना प्रशासनाचे घोडे कधी धावणार, हा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. संकटकाळी या बिकट आणि संतापजनक परिस्थितीत, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केवळ नेता म्हणून नाही, तर एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती मिळून आली आहे.बाळासाहेब थोरात हे पहाटेपासूनच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि तातडीने प्रशासनाला मदतीसाठी कडक सूचना दिल्या होत्या.तर त्यांच्या एका हाकेवर कार्यकर्ते सकाळपासूनच सादतपूरमध्ये तळ ठोकून मदतीसाठी उतरले असल्याचेही एकंदरीत चित्र दिसून आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधाराचा शब्द दिला. तसेच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनीही तातडीने गावात धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.त्यामुळे या दुःखाच्या क्षणी बाळासाहेब थोरात यांनी राजकीय सांत्वनाची औपचारिकता टाळली, आणि केवळ मायेचा आधार देण्याचे काम केले असल्याचं बोललं जातं आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला केवळ सूचना दिल्या नाहीत, तर या संकटात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच, सहकारी संस्थांच्या संपूर्ण यंत्रणेला त्यांनी सतर्क राहण्याचा स्पष्ट आदेशही दिला आहे. सादतपूरवर ओढवलेल्या या संकटात, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे माणुसकीचा ओलावा अजूनही जिवंत असल्याची ग्वाही मिळाली. आता पंचनाम्याचे काम तातडीने सुरू करून, नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ आणि भरीव मदत कधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Post a Comment