स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन अटकेत,
जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही,Sp.घार्गे, पोलिसांना पाहताच चालकांनी काढला पळ,
कोपरगाव प्रति:दि 15 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत दोन अवैध वाळूने भरलेले टेम्पो पकडण्यात आले असून, २२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोना भिमराज खर्से, राहुल डोके, पोकॉ प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर आणि मनोज साखरे यांचा समावेश होता. हे पथक कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीची माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली.त्या माहितीनुसार, माहेगाव देशमुख शिवारातून गोदावरी नदीपात्रातून दोन टेम्पोमधून वाळूची अवैध वाहतूक केली जाणार होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल दिलीप विघे (वय २७) आणि कृष्णा संजय सोनवणे (वय २६) अशी आहेत. चौकशीत अमोल विघे हा टेम्पोचा चालक-मालक असल्याचे समोर आले, तर कृष्णा सोनवणेच्या टेम्पोचा मालक सचिन जाधव हा फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कारवाईत पोलिसांनी दोन्ही टेम्पो आणि त्यातील वाळू असा एकूण रु. २२,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.
Post a Comment