February 2026

एकाच कुटुंबातील चिमुरड्यांसह ६ जणांचा मृत्यू?महामार्गावरील वाढती वेगमर्यादा आणि खंडाळा परिसरातील धोकादायक वळणे ;





​श्रीरामपूर (प्रति : दि २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार,श्रीरामपूर-बाबळेश्वर महामार्गावर खंडाळा परिसरात आज दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका भरधाव स्विफ्ट कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार ६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, MH 03 AF 0054 क्रमांकाची स्विफ्ट कार खंडाळा शिवारातून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकशी तिची अत्यंत भीषण धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. धडकेनंतर कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना गाडीचे पत्रे कापून मोठी कसरत करावी लागली.प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक श्रीरामपूर शहरातील स्थानिक संतोष वडापाव (बस स्टँड समोर) यांच्या कुटुंबातील असल्याचे समजते. यामध्ये दोन लहान मुले आणि पाच प्रौढ व्यक्तींचा समावेश असून, त्यापैकी किमान ५ ते ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अधिकृत आकड्याबाबत अद्याप प्रशासनाकडून स्पष्टता येणे बाकी आहे.घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.महामार्गावरील वाढती वेगमर्यादा आणि खंडाळा परिसरातील धोकादायक वळणे यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोणी आणि श्रीरामपूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा गौरव,आमदारांच्या यांच्या हस्ते हनुमानरायाची देखील आरती ;




संगमनेर, प्रति: दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास  मंत्रोच्चारांच्या स्वरात विधिवत दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली.छत्रपती शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा गौरव करत छत्रपतींचे आदर्श समाजाने आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. छत्रपती शिवरायांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. युवकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजकार्यात पुढे यावे, असे आमदार खताळ यांनी सांगितले. यावेळी आमदारांच्या यांच्या हस्ते हनुमानरायाची सुद्धा आरती करण्यात आली.या कार्यक्रमास शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, वरद बागुल, ऋषिकेश मुळे, प्रवीण कर्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांमुळे भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल,आमदार अमोल खताळ यांनी दिली माहिती ;


संगमनेर, प्रति; दि 14 फेब्रुवारी2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार व कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी ९७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा टप्प्याटप्याने विकसित केल्या जातील, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.कुंभमेळा आयोजनाच्या दृष्टीने मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये संगमनेर पंचायत समिती ते तळेगाव फाटा, तळेगाव फाटा ते निळवंडे फाटा, आणि निळवंडे फाटा ते जांभुळवाडी फाटा मार्गांचा समावेश आहे. या मार्गांसाठी एकूण ९७ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांमुळे भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळेल तसेच तालुक्याच्या पायाभूत विकासाला मोठी चालना मिळेल. सध्या जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना प्राधान्य देत नियोजित रस्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या, त्यांची आस्था व होणारी गर्दी लक्षात घेऊन महायुती सरकार पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

------------------   -कोट - -------------------------
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन या सर्वांच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना सुरक्षित आणि वेगवान दळणवळण मार्ग उपलब्ध करण्याच्या दृष्टीने संगमनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी ९७ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. रस्त्यांची दर्जेदार कामे भविष्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला पूरक ठरणार आहेत.
आमदार अमोल खताळ (संगमनेर)
-------------–--------------------------------------------

आ.अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे यांना निवेदन, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ;


​संगमनेर प्रति: (रफिक सौदागर) दि 13 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी किरकोळ कारणांसाठी ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिव वाहतूक सेना व रिक्षा सेनेच्या वतीने रिक्षा चालक-मालकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष अशोक बढे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.जिल्हाप्रमुख श्री.सचिन कोते पाटील व उपजिल्हाप्रमुख श्री.अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक समिर बारवकर, तसेच आमदार.अमोल खताळ आणि अपक्ष आमदार .सत्यजितदादा तांबे यांना संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले, सदर मोर्चाचे नेतृत्व वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख व तालुकाध्यक्ष अशोक बढे यांनी केले. यावेळी उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद यांनी सदरील आंदोलनाचे नियोजन केले होते,वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख अशोक सूर्यभान बढे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या रिक्षा व्यवसायात प्रचंड स्पर्धा असून उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशातच श्रीरामपूर आरटीओचे अधिकारी 'मार्च एंडिंग'चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंडाची सक्ती करत आहेत. जाचक दंड: गाडीचे पासिंग नसणे, एखादा प्रवासी जास्त असणे किंवा पीयूसी/एनओसी नसणे अशा किरकोळ चुकांसाठी थेट ४ ते ८ हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त असून, पैसे न भरल्यास रिक्षा जप्त केल्या जात आहेत. हा प्रकार 'हुकूमशाही' असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे. जर ही सक्तीची आणि अन्यायकारक वसुली तात्काळ थांबली नाही, तर संगमनेर शहरातील सर्व रिक्षा चालक, मालक आणि वाहक संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे 'ठिय्या आंदोलन' करतील. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि खासदार देखील सहभागी होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

------------------------- चौकट ---------------------
नियम हे जनतेच्या हितासाठी असावेत, छळासाठी नव्हे. मार्च एंडिंगच्या नावाखाली गरिबांना लुटणे थांबवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.
 उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेना तालुकाप्रमुख अशोक बढे,
--------------------------------------------------------

ठाकरेंची शिवसेना बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा सक्रिय अवस्थेत.शिर्डी लोकसभेतील अकोले,संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपूर अशा महत्त्वाच्या तालुक्यात झाल्या नियुकत्या ;




शिर्डी प्रति : दि 8 फेब्रुवारी2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिर्डी लोकसभेतील कार्यकारिणीत बदल करण्यात आल्या नंतर येथील ठाकरेंची शिवसेना बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा सक्रिय अवस्थेत जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वात येत आहे. शिर्डी लोकसभेतील अकोले,संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपूर अश्या महत्वाच्या तालुक्यात गेल्या दहा ते वीस पंचवीस वर्षापासून शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांना शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांसह कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर जबाबदारी देऊन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते संजयजी राऊतखासदार अनिलजी देसाई यांनी अनोखा प्रयोग केल्याने शिवसैनिकांत नवसंचार आल्याने आगामी पंचायत समिती - जिल्हा परिषद निवडणूक मोठ्या ताकदीनीशी लढायचा निर्धार शिवसैनिकांनी केला असून गट तट विसरून सर्व शिवसैनिकांची वज्रमूठ आता संपूर्ण सहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक नियोजन करण्यास सज्ज असल्याचे मार्गदर्शन करताना सचिनभाऊ कोते पाटील यांनी सांगितलेयावेळी संगमनेर कोपरगाव येथील उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख संघटक समन्वयक उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख सह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित देखील करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूर येथील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले तर जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर, बाळासाहेब जाधव, प्रमोद अण्णा लबडे, नाना बावके लखन भगत  संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्कंडे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले तर कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित पदाधिकारी उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे पश्चिम, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे पूर्व, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर, शहरप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख फैसल सय्यद, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा संघटक दिपक साळुंके, शहर संघटक आसिफ तांबोळी, वाहतूक सेना (रिक्षा सेना) तालुकाप्रमुख अशोक बडे, वाहतूकसेना शहरप्रमुख माघाडे, तालुकाप्रमुख अश्वि मंडल प्रकाशराजे गायकवाड, बोटा मंडलप्रमुख अमित फटांगरे, युवासेना (पठारभाग) तालुकाप्रमुख लखन सोन्नर, युवा तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ युवासेना विधानसभाप्रमुख अमोल डुकरे, तालुकासंघटक मच्छिंद्र दिघे, उपतालुकाप्रमुख सचिन दिघे, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ सातपुते, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब हासे, उपतालुकाप्रमुख रवी गिरी, उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, उपतालुकाप्रमुख त्र्यंबक शिंदे, उपतालुकाप्रमुख अरुण भालेराव, उपतालुकाप्रमुख एकनाथ खेमनर, उपतालुका प्रमुख संजय सोनवणे कैलास नवले गोकुळ लांडगे व्यापारी आघाडी शहरप्रमुख संभवशेठ लोढा, उपशहरप्रमुख रहिम बेग, परवेझ शेख, मुकेश काठे, प्रविण चव्हाण, दीपक वन्नम, जितेंद्र दर्वे, अनिल खुळे, तसेच महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आशाताई केदारी, संगीता ताई गायकवाड, वैशालीताई वडतले ह्या सर्वांचा सत्कार व सन्मान जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील व विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे  तसेच राहता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या  हस्ते करण्यात आला.

आरोपींना आता वर्षभर जामीन नाही; मोक्कासारख्या कडक कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ ;


​संगमनेर प्रति : दि 6 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील 'ब्रह्मास्त्रा'चा वापर सुरू केला आहे. कोल्हेवाडी रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी केवळ दरोड्याचा गुन्हा दाखल न करता, त्यात कलम १११ (संघटित गुन्हेगारी) ची वाढीव तरतूद केली आहे. या कारवाईमुळे आरोपींना आता किमान एक वर्ष जामीन मिळणे दुरापास्त झाले असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

  ------------------नेमकी कारवाई काय?---------------
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना, कोल्हेवाडी रोडवर काही इसम अंधाराचा फायदा घेऊन शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ मोटारसायकल, ३ मोबाईल, कोयते, कुऱ्हाड, मिरची पूड आणि इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती.

                    हे आहेत अटकेतील 'भाई'

​१. अलिम अकबर पठाण (वय २४, रा. जमजम कॉलनी) - याच्यावर यापूर्वी तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२. वसीम मन्सूर शेख (वय ३८, रा. मदिनानगर).
३. निलेश बाळासाहेब शेळके (वय ४०, रा. वाघापूर).
४. सलमान अकबर पठाण (वय २४, रा. कोल्हेवाडी).
५. अनमोल कुरनवाश चव्हाण (वय १९, रा. घुलेवाडी).
६. सलीम अकबर पठाण (वय २६, रा. जमजम कॉलनी) - याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत.

----------- काय आहे कलम १११ चे महत्त्व? -----------
नवीन कायद्यातील कलम १११ हे विशेषतः संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमात मोक्का कायद्याप्रमाणेच कडक शिक्षेची तरतूद असून गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.हे कलम लावले नसते तर आरोपी ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर आले असते, मात्र आता किमान १ वर्ष त्यांना तुरुंगातच राहावे लागेल. विशेष म्हणजे आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा अधिक गुन्हे केल्याने अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांनी या कलमाच्या वापरासाठी विशेष परवानगी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. समीर बारवकर, पोसई पगारे व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. नवीन कायद्याची ही प्रभावी अंमलबजावणी संगमनेरमधील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.

------------------------- चौकट -------------------
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे मागील दहा वर्षात गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांचा एकत्रित क्राईम डाटाबेस ( crime data base) तयार करण्यात आलेला आहे. व तो सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे.या क्राईम डाटाबेसमुळे दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित झाली आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्यावर मोकासारखी कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील एक अंमलदार फक्त या कामासाठी नेमण्यात आलेला आहे. सदरचा अंमलदार दररोज दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यातील गुन्हेगारावर पूर्वीचे गुन्हे असतील तर त्या गुन्हेगारावर व त्याच्यासोबत गुन्हा करणाऱ्या अन्य गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहितेतील कलम 111 चा  वापर करता येईल का? याचा आढावा घेतला जातो.चालू वर्षात आत्तापर्यंत उत्तर नगर जिल्ह्यातील चार गुन्ह्यांना सदरहू कलमान्वये कारवाई केली आहे " अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे विभाग श्रीरामपूर
-----------------------------------------------------

श्रेय लाटणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं’; पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर खताळांचा थेट प्रहार ;



​संगमनेर प्रति : दि 5 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, जे चाळीस वर्षे फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात व्यस्त होते आणि जे फक्त पदवीधर आमदार बनून मिरवत होते, त्यांना आपल्याच मतदारसंघातील पोलिसांचे प्रश्न सोडवायला वेळ का मिळाला नाही? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावे आणि मगच श्रेय लाटायला पुढे यावे," अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला. संगमनेर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सुरू झालेल्या श्रेयवादाच्या लढाईत खताळांनी विरोधकांचा अक्षरशः धुराळा उडवला आहे.

​--------------- पोलीस वसाहत की 'नरकवास '?--------
​आमदार खताळ यांनी पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेवर भाष्य करताना विरोधकांच्या ४० वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, १९६० च्या दशकातील या इमारती आता 'मृत्यूचा सापळा' बनल्या आहेत. पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, नादुरुस्त गटारी आणि शौचालयांचे चेंबर यांमुळे पोलीस बांधव नरकयातना भोगत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारती राहण्यास अयोग्य ठरवूनही वर्षानुवर्षे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
​------- खताळांचा 'अधिवेशनातील' तो कडाका! -------
हा प्रश्न सुटावा यासाठी आमदार खताळ यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता थेट विधानसभेत आवाज उठवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज ही वसाहत अंतिम टप्प्यात आली आहे. जुन्या आणि धोकादायक इमारती जमीनदोस्त करून त्या ठिकाणी आता अद्ययावत, सुरक्षित आणि हायटेक पोलीस टॉवर्स उभे राहणार आहेत.

------------- श्रेय लाटणाऱ्यांना लगावला टोला ------------
प्रशासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होताच काही मंडळींनी सोशल मीडिया आणि फलकबाजीच्या माध्यमातून या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यावर कडाडून टीका करताना खताळ म्हणाले, "जनतेला सर्व ठाऊक आहे. हा प्रश्न कोणी विधानसभेत लावून धरला आणि कोणी मुख्यमंत्र्यांच्या दालनातून फाईल मंजूर करून आणली, हे लपून राहिलेले नाही. काम पूर्ण होताना पाहून काहींची धडपड सुरू झाली आहे, पण जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस आता संपले आहेत."

-------- पुढील संकल्प: अधिकाऱ्यांचेही प्रश्न सुटणार-----
​केवळ कर्मचाऱ्यांचेच नाही, तर संगमनेरमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासाठी नियुक्त अधिकाऱ्यांना स्वतंत्र आणि भव्य निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा मानसही आमदार खताळ यांनी व्यक्त केला आहे. त्याचाही पाठपुरावा सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

--------------------​----- चौकट ----------------------
थोरात-तांबेंच्या ४० वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळावर जोरदार प्रहार.​तर पदवीधर आमदार म्हणून मिरवणाऱ्यांना या आगोदर पोलिसांचे प्रश्न का दिसले नाहीत?
​मात्र आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि विखे पाटलांच्या मदतीने वसाहतीचा प्रश्न कायमचा सुटणार.
 श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्यांना आरसा दाखवण्याचे काम खताळांनी केले.
​आमदार खताळ यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस बांधवांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे
.

----------------------------------------------------------------

महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण. संगमनेरच्या विकासातही त्यांचे मोलाचे सहकार्य. संगमनेरमध्ये गुरुवारी श्रद्धांजलीचे आयोजन


संगमनेर प्रति: दि 3 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यासह संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता,  मालपाणी लॉन्स येथे सर्वपक्षीय आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात व  शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी  दिली आहेया सभेमध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर असलेली पकड आणि विकासकामांचा धडाका यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संगमनेरच्या विकासातही त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते, याची आठवण या निमित्ताने जनमानसात व्यक्त होत आहे.

-------------------------- चौकट ----------------------------
कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले आमचे नेते अजितदादा यांच्या जाण्याने आमची खूप मोठी हानी झाली आहे, आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे,  

कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांचे आवाहन

-------------------------------------------------------------------

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची मोठी कारवाई; १० वर्षांच्या 'क्राईम डेटाबेस'ने आवळला गुन्हेगारांभोवती फास ;


​श्रीरामपूर प्रति: दि १ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासन आक्रमक झाले आहे. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विभागातील ३४ सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केले आहेत. यामध्ये टोळी प्रमुख आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्यांचा समावेश आहे.
​तंत्रज्ञानाचा वापर: 'क्राईम डेटाबेस' ठरला गेमचेंजर
​पोलीस दलाने २०१६ ते २०२५ या १० वर्षांतील गुन्हेगारांचा एक सविस्तर 'क्राईम डेटाबेस' तयार केला आहे. यामध्ये गुन्हेगारांची पद्धत (Modus Operandi) आणि त्यांच्या गुन्ह्यांचा प्रकार (शरीरविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध, अमली पदार्थ) याची अचूक वर्गवारी केली आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
​हद्दपारीच्या प्रस्तावातील प्रमुख आरोपींची यादी (पोलीस ठाण्यानुसार)
:पोलीस ठाणे प्रस्तावित गुन्हेगाराचे नाव वय गुन्ह्यांची संख्या

१ श्रीरामपूर शहर योगेश सचिन गुंजाळ (बेलपुर बु.) २३ ४

२ श्रीरामपूर शहर भारत विष्णू धोत्रे (वॉर्ड नं. ३) ३० ४

३ श्रीरामपूर शहर तंजील गफार खान (हुसेन नगर) २५ २१

४ श्रीरामपूर शहर प्रशांत संजय थोरात (शिरसगाव) २७ ४

५ श्रीरामपूर ता. मनोज यशवंत पवार (टाकळीभान) २४ ३

६ राहुरी आरिफ गफुर शेख (पिंप्री अवघड) ३२ ९

७ राहुरी अक्षय मच्छिंद्र कुसुमडे (वांबोरी) - ४

८ राहुरी करण भारत माळी (राहुरी) - ५

९ राहुरी योगेश सोपान बाचकर (नांदूर) - ४

१० कोपरगाव शहर वैभव मुकेश कुन्हाडे (इंदिरानगर) २२ ३

११ कोपरगाव शहर अनिकेत गणेश जाधव (गांधीनगर) २५ ४

१२ कोपरगाव शहर योगेश सुरेश गायकवाड (गांधीनगर) २५ ३

१३ कोपरगाव ता. बापू दत्तू शोधक (सोनेवाडी) ३० ३

१४ कोपरगाव ता. संदिप दादा काळे (सुरेगाव) २२ ३

१५ शिर्डी संकेत आप्पासाहेब गव्हाणे (कालिका नगर) - ६

१६ शिर्डी संतोष बाबुराव शिंदे उर्फ शफ्या - ५

१७ राहाता प्रशांत जनार्दन जाधव (सांईनगर) - ६

१८ राहाता प्रविण नानासाहेब वाघमारे (पिंपळस) २८ १३

१९ राहाता गोकुळ कारभारी मासाळ (रांजणगाव खु.) - ३

२० संगमनेर शहर शुभम बाळू गायकवाड (घुलेवाडी) २० ७

२१ संगमनेर शहर सद्दाम मन्सूर शेख (सय्यद बाबा चौक)२५ ३

२२ संगमनेर शहर संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या - ७

२३ संगमनेर शहर अमोल संजय जोंधळे (गुंजाळवाडी) - ३

२४ संगमनेर ता. सुयोग अशोक दवांगे (हिवरगाव पावसा)२२५

२५ संगमनेर ता. सत्यम भाऊसाहेब थोरात (वडगाव पान) - ३

२६ अकोले जनार्दन कमलाकर नवले (नवलेवाडी) ४४ ६

२७ घारगाव अण्णासाहेब सुर्यभान वाडगे (घारगाव) ४५ ४

तर विशेष म्हणजे नेवासा येथील 'गर्जे टोळी'वर विशेष लक्ष

नेवासा पोलीस ठाण्यांतर्गत शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे (टोळी प्रमुख) याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य आकाश उर्फ दत्तू सावंत, दत्तात्रय मच्छिंद्र सावंत आणि योगेश मच्छिंद्र सावंत यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या टोळीवर १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दिलीप दत्तात्रय शेलार आणि यासीन गणी शेख यांच्यावरही कारवाई प्रस्तावित आहे. 

--------------------------चौकट----------------------

"समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींचा वापर करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा क्राईम डेटाबेस 'कणा' ठरणार आहे." सोमनाथ वाघचौरे (अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर).

-------------------------------------------------------    

​या मोहिमेत विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि १७ पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget