आ.अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे यांना निवेदन, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा ;
संगमनेर प्रति: (रफिक सौदागर) दि 13 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी किरकोळ कारणांसाठी ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित शिव वाहतूक सेना व रिक्षा सेनेच्या वतीने रिक्षा चालक-मालकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष अशोक बढे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.जिल्हाप्रमुख श्री.सचिन कोते पाटील व उपजिल्हाप्रमुख श्री.अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक समिर बारवकर, तसेच आमदार.अमोल खताळ आणि अपक्ष आमदार .सत्यजितदादा तांबे यांना संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले, सदर मोर्चाचे नेतृत्व वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख व तालुकाध्यक्ष अशोक बढे यांनी केले. यावेळी उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद यांनी सदरील आंदोलनाचे नियोजन केले होते,वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख अशोक सूर्यभान बढे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या रिक्षा व्यवसायात प्रचंड स्पर्धा असून उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशातच श्रीरामपूर आरटीओचे अधिकारी 'मार्च एंडिंग'चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंडाची सक्ती करत आहेत. जाचक दंड: गाडीचे पासिंग नसणे, एखादा प्रवासी जास्त असणे किंवा पीयूसी/एनओसी नसणे अशा किरकोळ चुकांसाठी थेट ४ ते ८ हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त असून, पैसे न भरल्यास रिक्षा जप्त केल्या जात आहेत. हा प्रकार 'हुकूमशाही' असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे. जर ही सक्तीची आणि अन्यायकारक वसुली तात्काळ थांबली नाही, तर संगमनेर शहरातील सर्व रिक्षा चालक, मालक आणि वाहक संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे 'ठिय्या आंदोलन' करतील. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि खासदार देखील सहभागी होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
------------------------- चौकट --------------------- नियम हे जनतेच्या हितासाठी असावेत, छळासाठी नव्हे. मार्च एंडिंगच्या नावाखाली गरिबांना लुटणे थांबवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेना तालुकाप्रमुख अशोक बढे, --------------------------------------------------------
Post a Comment