October 2025

अन्यायाशी दोन हात करणारी लेखणी आणि कॅमेरा, न्यू मुळा प्रवरा आणि न्यूज NMP कडून दिवाळीचा खास कृतज्ञता' संदेश;


​संगमनेर प्रति: दि.21 ऑक्टोबर 2025 दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. परंतु, गेल्या १८ वर्षांपासून जनसामान्यांच्या जीवनातील समस्यांचा अंधार दूर करत, त्यांच्या प्रश्नांना सातत्याने शासन दरबारी 'प्रकाशात' आणण्याचे व्रत घेतलेल्या साप्ताहिक न्यू मुळा प्रवरा आणि सात वर्षांपासून अन्याय-अत्याचाराविरोधात लढणाऱ्या मराठी वाहीनी न्यूज NMP चॅनल ने आपल्या लाखो वाचक आणि प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. साप्ताहिक मुळा प्रवराचा उगम म्हणजे या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र पहिला अंक सन 1995 मधे सार्वमत चे संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला होता. 1995 ते 2005 पर्यंत संपादक गुलाब भाई शेख यांनी तो प्रवास स्वतःच केला त्यानंतर 2006 मध्ये साप्ताहिक न्यू मुळा प्रवरा हे वृत्तपत्र कार्यकारी संपादक शौकत पठाण यांच्या मागणीवर नवी दिशा नवीन आशा म्हणून प्रकाशित करण्यात आले आणि ते आज तयागत सातत्याने सुरू देखील आहे,गुलाब भाई शेख यांच्या नेतृत्वाखालील या माध्यम समूहाने आपला हा प्रवास केवळ बातमीदारी म्हणून नव्हे, तर 'जनतेचा लढा म्हणून केला आहे. 'निष्पक्ष' आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून कित्येक पीडितांना न्याय मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे. या प्रवासाचा उल्लेख करताना संस्थेने अत्यंत भावनिक आभार मानले आहेत.यावेळी संस्थेचे मुख्य संपादक गुलाब भाई शेख म्हणाले, आम्ही करत आलेले हे कार्य केवळ पत्रकारिता नाही, तर श्रेयाची शर्यत आहे. आणि या शर्यतीत आमच्या संघर्षापेक्षा तुमच्या सारख्याच वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या अत्यंत मोलाच्या साथीचा वाटा मोठा आहे. तुमचा विश्वास हाच आमचा खरा दिवाळी बोनस आहे.या शुभ मुहूर्तावर, कार्यकारी संपादक शौकत पठाण, सह संपादिका बानोबी शेख, आणि संपूर्ण टीमच्या वतीने समस्त वाचकांच्या कुटुंबियांना समृद्धी, धैर्य आणि यशाची कामना करण्यात आली आहे. यावेळी या शुभ दीपावलीच्या मंगलमय मुहूर्तावर, संस्थेचे मुख्य संपादक गुलाब भाई शेख, कार्यकारी संपादक शौकत पठाण, सह संपादिका बानोबी शेख, संगमनेर तालुका सह संपादक जमीर शेख उर्फ बाबू पाकीजा, घारगाव पठार भाग सहसंपादक वसीम सय्यद, अकोले संगमनेर प्रतिनिधी युसुफ शेख, पुणे प्रतिनिधी आरिफ इनामदार, महिला प्रतिनिधी निकहत मुंढे, तसेच महाराष्ट्रभरातील सर्व प्रतिनिधी यांच्या वतीने वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या कुटुंबाला 

  • धनलक्ष्मी (संपत्ती)
  • धान्यलक्ष्मी (समृद्धी)
  • धैर्यलक्ष्मी (न घाबरता संकटांना सामोरे जाण्याचे बळ)
  • शौर्यलक्ष्मी (पराक्रम)
  • विद्यालक्ष्मी (ज्ञान)
  • कार्यलक्ष्मी (कामामध्ये यश)
  • विजयालक्ष्मी (विजय)
  • राजलक्ष्मी (सन्मान व प्रतिष्ठा) अष्टलक्ष्मींच्या' कृपेचा आशीर्वाद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली,

✍️ कार्यकारी संपादक: शौकत पठाण

समता परिवाराकडून सुख-समृद्धीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!शौकतभाई शेख व कुटुंबियांकडून अष्टलक्ष्मी कृपेची सदिच्छा!


श्रीरामपूर प्रति: दि.21 ऑक्टोबर 2025 दीपावली आणि पाडव्याच्या मंगलमय पर्वावर, स्वाभिमानी संपादक सेवा संघ आणि समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी आपल्या सर्व हितचिंतकांना व महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत सस्नेह नमस्कारासह आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.या निमित्ताने, श्री. शेख यांनी प्रत्येक कुटुंबाला धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, आणि राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मींच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा वर्षाव व्हावा, अशी प्रार्थना केली आहे. ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे, अशी त्यांची मनोकामना आहे.

सेवांचा महादीप - समता परिवाराची जनसेवेसाठी सज्जता!

केवळ शुभेच्छाच नाही, तर समता परिवार या दिवाळीतही आपल्या विविध संस्था आणि फर्म्सच्या माध्यमातून जनसेवेसाठी तत्पर आहे.

संस्था/फर्मचे नाव

प्रमुख सेवा आणि कार्यक्षेत्र

समता फाऊंडेशन

सेवाभावी उपक्रम आणि सामाजिक कार्य.

स्वाभिमानी संपादक सेवा संघ

पत्रकारांचे संघटन आणि मार्गदर्शन.

समतादूत 24 X 7 न्यूज

ताज्या व सत्य बातम्या (युट्यूब चॅनल).

समता C.S.C. ॲकेडमी & कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट

तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकास.

समता टॅक्स सर्व्हिसेस

करविषयक सल्ला आणि सेवा.

समता प्रिंटर्स (ऑफसेट/फ्लेक्स)

सर्व प्रकारचे मुद्रण (Printing) कार्य.

समता झेरॉक्स & ऑनलाईन सर्व्हिसेस (शिरसगांव)

आरटीओ कार्यालयीन कामे: ई-आधार कार्ड कलर प्रिंट, अर्जंट पासपोर्ट फोटो, आरटीओ कार्यालयातील विविध कामांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट व फी पेमेंट वाजवी दरात करून मिळेल.


नवयुवकांसाठी खास संधी: समता कार्यालय (नवोदित संपादक मार्गदर्शन केंद्र) हे नवोदित संपादकांना आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी SMT सर्कल, कॉलेज रोड, श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे.

एक वेळ अवश्य भेट द्या!

संपर्क कार्यालये:

१) श्रीरामपूर जि. अहमदनगर

२) मेहकर जि. बुलढाणा

संपर्क क्रमांक: ९५६११७४१११ / ९२२६८३३०२०

॥ समता एक ध्यास ! समता एक विश्वास !!॥

✍️ कार्यकारी संपादक; शौकत पठाण संगमनेर

शाहिद हाफिज शेख यांचे १४ वर्षांच्या संघर्षानंतर निधन,शेख परिवारासह मित्रपरिवारावर शोककळा;





​संगमनेर प्रति: दि.19 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री गणी हाजी शेख यांचे भाचे तसेच माजी उपनगराध्यक्ष इम्रान गणी शेख व  माजी नगरसेवक नुरमहंमद पिरमहंमद शेख यांचे आत्तेभाऊ,सर्वांचे लाडके आणि आधार' म्हणून ओळखले जाणारे शाहिद हाफिज शेख यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. जीवघेण्या आजारासोबत तब्बल 14 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या तरुण वयात काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतल्याने केवळ संगमनेर शहरावरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.शाहिद हाफिज शेख यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या कामातून एक अशी ओळख निर्माण केली होती की, ते कोणत्याही एका विशिष्ट गटाचे नव्हते, तर संपूर्ण समाजाचे नेतेच होते. राजकीय क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांसाठी काम केले.त्यांचे सर्वात मोठे योगदान हे सामाजिक क्षेत्रात होते. त्यांनी गरजू आणि निराधार लोकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संगमनेर शहरात आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त झाली. अनेकांना धक्का बसला आणि शहरावर जणू शोक कळा पसरली. एकूणच सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या तोंडून एकच चर्चा सुरू होती,ती म्हणजे "घरचा नव्हे तर गावाचा कर्ता हरपला आहे. शाहिद भाई' किंवा 'शाहिद भाऊ' म्हणून ते अत्यंत लोकप्रिय होते. लोक त्यांना आपला 'दाता आणि कर्ता मानत असत. 'ज्याला आधार नाही त्याला शाहीदचा मोठा आधार होता', अशा शब्दांत अनेकजण आपल्या भावना व्यक्त करत होते.शाहिद शेख यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील पोकळी स्पष्ट जाणवत आहे. सामाजिक असो वा राजकीय, सर्वच स्तरांतील नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक सलोख्यासाठी झटणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. शाहिद शेख यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची 14 वर्षे एका मोठ्या आजारपणासोबत संघर्ष केला. प्रकृतीची साथ नसतानाही त्यांनी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य कधी सोडले नाही. त्यांच्या या प्रदीर्घ संघर्षाची कहाणी सर्वांसाठी हृदयद्रावक ठरली आहे.


------------------💐---------------------💐---------------------
शाहिद हाफिज शेख यांना संगमनेरकरांकडून आणि तमाम स्नेह्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
------------------💐---------------------💐---------------------

✍️ कार्यकारी संपादक: शौकत पठाण

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद दाखवून देऊ,सचिन कोते जिल्हा प्रमुख उत्तर नगर.निवडणुकीत सच्च्या शिवसैनिकांना उमेदवारी मिळणार;


संगमनेर प्रति:दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेने शिर्डी लोकसभेच्या जिल्हाप्रमुख पदी सचिन कोते पाटील व जगदीश चौधरी यांची नियुक्ती केल्या नंतर प्रथमच काल दि.14 रोजी सायंकाळी 05 वाजता संगमनेर येथे आले असता  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक अमर कतारी यांच्या पुढाकारातून संगमनेर शासकीय विश्रांती गृह येथे सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्तरेत झालेल्या संघटनात्मक बदलामुळे युवासैनिक व महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे.तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातूनही शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवल्याने जुनी मरगळ झटकून ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक आता रणांगणात उतरल्याचे दिसून आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख तथा शिर्डी साईबाबा मंदिर माजी विश्वस्त सचिन कोते पाटील यांचा तसेच निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांचा संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे स्वागत करतांना आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सच्च्या शिवसैनिकांना उमेदवारी देऊन निष्ठावंताचा सन्मान करण्याचे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शक्यतो महाविकास आघाडी म्हणून आणि महाविकास आघाडी नाही झाली तर संपूर्ण ताकतीने सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे व त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन सचिन कोते यांनी दिले आहे.तसेच जगदीश चौधरी यांनी देखील सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आपली ताकद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे शरद पवार साहेब व सन्माननीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडून आपल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देऊ शिवसैनिकांनो तयारीला लागा आपले उमेदवार निवडून आलेच पाहिजे असे आवाहन अमर कतारी यांनी केले यावेळी श्रीरामपूर येथून आलेले अशोक मामा थोरे व कोपरगाव येथील भारत भाऊ मोरे यांनी देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले कोपरगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक असलम भाई शेख व पैलवान गगन हाडा शुभम वाघ देखील उपस्थित होते  प्रास्ताविक दीपक साळुंखे यांनी केले व आभार असिफ तांबोळी यांनी मानले तसेच स्वागत युवा सेनेचे अमित भाऊ चव्हाण फैसल सय्यद  अक्षय गुंजाळ  गोविंद नागरे योगेश खेमनर राजू सातपुते वैभव अभंग अक्षय गाडे अमोल डुकरे सचिन साळवे यांच्या वतीने करण्यात आले,यावेळी महिला तालुकाप्रमुख शितलताई हासे भाऊसाहेब हासे  पठार भाग तालुका प्रमुख संजय फड ईम्तियाज शेख  रहीम बेग अल्ताफ शेख सदाशिव हासे आश्वी चे युवा नेते प्रकाश राजे गायकवाड  रंगनाथ फटांगरे पप्पू कानकाटे मुस्लिम मावळा अजीज मोमीन रिक्षा सेनेचे अशोक बडे व रिक्षा सेनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय भाऊ सातपुते सचिन धनवटे बाळासाहेब कवडे प्रभाकर गेठे. लांडगे साहेब प्रशांत खजुरे प्रकाश चोथवे अनिल खुळे पूजा कतारी सुंनंदा कतारी काजल राठोड लक्ष्मी खिची सुगरिता खिची मनवा तडासम मीनाक्षी मसराम संगीता खजुरे मनीषा खजुरे साधना पवार मोहिनी कतारी  गौरी राजगोड गुड्डी पवार  दीपक वनम महमूद भाई मुसा भाई मोहसीन शेख व वैशाली ताई वढतल्ले व महिला कार्यकर्ते तसेच नगरपालिका पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवार देखील मोठ्या संख्येने इच्छुक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे ​प्रास्ताविक दीपक साळुंखे यांनी केले, तर आभार असिफ तांबोळी यांनी मानले.


✍️सा.न्यु मुळा प्रवरा

बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले! शहरात प्लास्टिकचा मोठा साठा आणत कोण?



संगमनेर प्रति: दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या  माहितीनुसार, संगमनेर शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या नावाखाली नगरपालिकेने जी 'कारवाईची मोहीम' हाती घेतली आहे, तिला 'प्रदूषणमुक्ती'चा मुखवटा आणि आतून 'पठाणी वसुली' असे स्वरूप आले आहे. बाजारात सुरू असलेल्या या पक्षपाती कारवाईमुळे शहरातील छोटे व्यापारी आणि फेरीवाले अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत, तर प्लास्टिकचा खरा साठा करणारे ठोक (होलसेल) व्यापारी अजूनही 'सेफ झोन'मध्ये आहेत!प्रदूषण आणि कचरा पसरवण्यास जबाबदार असलेल्या मूळ पुरवठादारावर कारवाई करण्याऐवजी, पालिका अधिकारी हातगाडीवाले, पथविक्रेते, आणि भाजी विक्रेते अशा दुर्बळ घटकांवर धाडी टाकत आहेत. या कारभारातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

​                 👉 उत्पादकांवर 'अभय' का? 

शहरातील मुख्य बाजारात आणि गोदामांमध्ये जो प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा येतो, त्यावर कारवाई का होत नाही? 'होलसेल' व्यापाऱ्यांवर हात टाकायला प्रशासन घाबरत आहे की त्यांना 'शविशेष अभय' दिले जात आहे? जर प्लास्टिकचे मोठे पुरवठादार धाकधुकीत आले, तर आपोआपच छोट्या विक्रेत्यांपर्यंत हा माल पोहोचणे थांबेल. पण, पालिकेने हा सोपा मार्ग सोडून केवळ दंड वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे 'प्लास्टिक माफियांचे हित' जपले जात आहे, हे स्पष्ट दिसते.
​टारगेट फक्त गरीब १००-२०० रुपयांची कमाई करणाऱ्या गरीब विक्रेत्यांना मोठा दंड ठोठावला जातो, ज्यामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येते. पालिका या दुर्बळ घटकांविरुद्ध कारवाई करून पोकळ आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील नागरिकांचे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, या कारवाईमागे प्रदूषणमुक्तीची तळमळ कमी आणि तात्काळ वसुलीचा हेतू जास्त आहे. नगरपालिकेने तात्काळ हा 'तोलामोला'चा खेळ थांबवावा आणि आपले संपूर्ण लक्ष शहरात प्लास्टिक आणणाऱ्या व विकणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांवर केंद्रित करावे.
 ज्या दिवशी बड्या व्यापाऱ्यांची गोडाऊन सील होतील, त्या दिवशीच संगमनेर शहर प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकेल अन्यथा, हा केवळ पठाणी दंड वसूल करण्याचा कार्यक्रम आहे, यात शंका नासावी,बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, आणि गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले जात असल्याने शहरात प्लास्टिकचा मोठा साठा कोण आणतो, याचा शोध नाही फक्त 'गरिबांना दंड' ठोकून पोकळ आकडेवारी दाखवाची, बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले! शहरात प्लास्टिकचा मोठा साठा आणत कोण? याकडे मात्र पालिकेचं सर्रास आणि दुर्लक्ष असल्याचा नागरिकांच्या चर्चेतून आरोप होत असताना दिसून येत आहे त्यामुळे आता पालिका प्रशासन अधिकारी मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे

पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात संपन्न.इंटस्' - जगाशी जोडणारी पाच सूत्रे;अक्कलकोट


​अक्कलकोट.प्रति: दि.10 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार,श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नुकताच ऋषिकेश चौगुले लिखित 'थ्रु युवर इंटस्' (Through Your EENTS) या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात संपन्न झाला आहे. हे पुस्तक केवळ एक वाचन साहित्य नसून, मानवी जीवनाच्या मूलभूत आणि दैनंदिन अस्तित्वावर विचार करण्यास लावणारे वैचारिक भाष्य आहे अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी अक्कलकोट या ठिकाणी प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यावर प्रसार माध्यमांना दिली आहे.               इंटस् - जगाशी जोडणारी पाच सूत्रे:

लेखक ऋषिकेश चौगुले यांनी स्पष्ट केल्यानुसार, 'थ्रु युवर इंटस्' हे पुस्तक माणसाच्या जीवनातील अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित आहे. आपण क्षणोक्षणी आपल्या डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच इंद्रियांच्या (EENTS) माध्यमातून जगतो. ही इंद्रिये केवळ माहिती गोळा करत नाहीत, तर आपली भावना, आठवणी आणि बाहेरील जगाशी असलेलं नातं कसं घडवतात, याचं सखोल मनोवैज्ञानिक विश्लेषण पुस्तकात करण्यात आलं आहे. आपण आपल्या इंद्रियांचा योग्य वापर केल्यास, आपल्या मनात सकारात्मकता आणि शांतता कशी निर्माण होते, यावर चौगुले यांनी भाष्य केलं आहे.                   समाधान आणि शांततेचा मार्ग:

चौगुले यांनी यावेळी सांगितले की, 'इंटस्'च्या विश्लेषणातून मिळालेला बोध आत्मसात केल्यास, जीवनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो आणि आपोआप शांती व समाधानाची अनुभूती येते. अक्कलकोटसारख्या आध्यात्मिक ठिकाणी या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण अध्यात्म आणि मानवी अस्तित्वाचा विचार या दोन्हींचा समन्वय 'इंटस्'च्या संकल्पनेत दिसून येतो.          पुढील पुस्तकात नात्यांमधील शांततेवर चिंतन

​चौगुले यांच्या आगामी कामातही मानवी मनाचे आणि नात्यांचे विश्लेषण दिसून येते. त्यांचे दुसरे पुस्तक, 'आय वॉन्ट टू बी हर्ड' (I Want To Be Heard), पालक आणि मुलांमधल्या शांततेमुळे (Communication Gap) मुलांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर आणि त्यांच्या एकटेपणावर आधारित आहे. आजच्या धावपळीच्या युगात, पालकांनी मुलांशी संवाद साधण्यात येणारी निष्क्रियता एका पिढीला कशा प्रकारे प्रभावित करत आहे, यावर हे पुस्तक प्रकाश टाकणार आहे.           मनस्वी चिंतन आणि आत्मपरीक्षणाची गरज:

थ्रु युवर इंटस् या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे, वाचकांना आपल्या इंद्रियांच्या कार्याकडे अधिक जागरूकतेने पाहण्याची संधी मिळेल. महेश इंगळे, महेश गोगी, प्रा. शिवशरण अचलेर यांच्यासह पुस्तकाचे लेखक ऋषिकेश चौगुले प्रमोद चौगुले स्वप्निल माने संजय आहेर गणेश घोरपडे विपुल जाधव व्यंकटेश पुजारी श्रीकांत मलवे अदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ऋषिकेश चौगुले यांचे हे पुस्तक वाचकांना आत्मपरीक्षण करण्याची आणि जीवनात सखोल मनस्वी चिंतन करण्याची दिशा देईल,अशी अपेक्षा श्रीक्षेत्र अक्कलकोट मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केली आहे.


✍️ सा.न्यु मुळा प्रवरा आणि News nmp Sangamner

ओबीसी' उमेदवारांचा शोध सुरू? आरक्षण सोडतीमुळे शहराच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप,आरक्षणामुळे पत्ता कट;




​संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीमुळे शहराच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला आहे. विशेषतः ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाचा 'खोडा' अनेक दिग्गज स्थानिक नेत्यांना बसला असून, त्यांच्या वर्षानुवर्षाच्या राजकीय तयारीवर पाणी फेरले गेले आहे. प्रांताधिकारी कार्यालय येथे मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सोडतीमध्ये अनेक प्रभागांमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले. या आरक्षणामुळे ज्या प्रभागांमध्ये ओबीसी मतदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे, तेथे आता ओबीसी उमेदवार मिळवण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. उमेदवार तर सोडाच, पण या अचानक आलेल्या आरक्षणामुळे मतदारांमध्येही तीव्र नाराजी आणि गोंधळाचे वातावरण आहे.

​             आरक्षणामुळे पत्ता कट झालेले दिग्गज
या आरक्षणामुळे थेट फटका बसलेल्यांमध्ये विद्यमान आणि इच्छूक अशा स्थानिक वजनदार नगरसेवकांचा समावेश आहे. गेली कित्येक वर्षे ज्या प्रभागांवर काही नेत्यांनी आपला अबाधित प्रभाव आणि जनसंपर्क टिकवून ठेवला होता, ते प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे 


ज्या प्रभागांमध्ये विशिष्ट पक्षाचे किंवा कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे वर्चस्व होते, त्या हक्काच्या जागा आरक्षित झाल्याने आता त्यांच्या राजकीय वारसदारांना नवा प्रभाग शोधावा लागत आहे. अनेक ठिकाणी आरक्षित जागेवर उभा राहण्यासाठी ओबीसी उमेदवारच उपलब्ध नाहीत, किंवा असले तरी त्यांचा त्या प्रभागात कोणताही जनसंपर्क नाही. यामुळे मतदारांना आपल्या ओळखीचा आणि प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

​                 उमेदवार आयातीची' वेळ
आरक्षणामुळे निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीमुळे अनेक प्रभावी स्थानिक नेत्यांना आता उमेदवार 'आयात' करण्याची नामुष्की ओढवली आहे. ज्या प्रभागात ओबीसी मतदारांची संख्या कमी असूनही जागा आरक्षित झाली आहे, तेथे पक्षांना दुसऱ्या प्रभागातील, किंवा फारसा राजकीय अनुभव नसलेल्या नवीन ओबीसी चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. ही परिस्थिती पाहता, निवडणुकीत पक्षांची सर्वात मोठी डोकेदुखी उमेदवारांचा शोध आणि त्यांची जुळवाजुळव करणे हीच असेल.

​                  राजकीय समीकरणे बदलणार
एकीकडे अनेक दिग्गज नेत्यांना आपला हक्काचा प्रभाग सोडावा लागणार आहे, तर दुसरीकडे ज्या प्रभागांमध्ये ओबीसींची संख्या चांगली आहे, तेथे मात्र इच्छुकांची गर्दी वाढणार आहे. परिणामी, संगमनेर नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभागांची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच काय तर संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतील हा 'आरक्षण बॉम्ब' स्थानिक राजकारणाची दिशा निश्चितच बदलणार असून, ओबीसी उमेदवारांचा प्रभावी शोध आणि बंडखोरी रोखणे हेच स्थानिक नेत्यांपुढील मोठे आव्हान असणार आहे. या राजकीय पेचप्रसंगावर मात करण्यासाठी संगमनेरचे स्थानिक नेतृत्व नेमकी कोणती रणनीती आखते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


आ.खताळ यांचा अमित शाहांसमोर विकासाचा पंचनामा, अहिल्यानगरला देशातील पहिले सहकार विद्यापीठ मिळणार?



लोणी.अहिल्यानगर प्रति: दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राज्यात राजकीय डबल इंजिन नाही, तर ट्रिपल इंजिन चे सरकार असताना मिळेल त्या संधीचं 'सोनं नाही, तर थेट कोहिनूर' करण्याची कडक खेळी संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी साधली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या लोणी येथील दौऱ्यात, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळ उपस्थित असताना, युवा आमदार खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साथीने थेट दिल्लीचे दरवाजे ठोठावले आहेत. ​संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या  भावी विकासाचा मास्टर प्लॅन असलेले निवेदन त्यांनी अमित शाह यांच्यासमोर सादर केले. या मागण्यांची व्याप्ती केवळ स्थानिक नाही, तर राज्याच्या नकाशावर जिल्ह्याला मोठे स्थान मिळवून देणारी असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

​ खताळ यांच्या 5 दमदार आणि टायमिंग'साधणाऱ्या मागण्या :

1) नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संगमनेरचा समावेश तातडीने करा.
 2) NH-60 (नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग) चे काम त्वरित हाती घेऊन तो सहा पदरी (Six-Lane) बनवा. 
3) सहकार क्षेत्राचे केंद्र असलेल्या महाराष्ट्रात देशातील पहिले सहकारी तत्वावरील विद्यापीठ (Cooperative University) अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा करा.
4) संगमनेर तालुक्याला कृषी हब (Agriculture Hub) म्हणून विकसित करण्यासाठी विशेष केंद्रीय निधी आणि योजना द्या.
 5) केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कामगार रुग्णालयाच्या स्थापनेला तत्काळ मंजुरी द्या
.

या मागण्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील स्तरावर योग्य ती कार्यवाही होईल असे स्पष्ट संकेत दिले असल्याची माहिती मिळून आली आहे.यामुळे एकूणच काय तर या गेमचेंजर भेटीमुळे आमदार अमोल खताळ यांचे वजन केवळ जिल्ह्यातच नाही, तर थेट केंद्राच्या राजकारणात वाढले आहे.एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित असताना, विकासाचा हा महत्त्वाचा विषय थेट दिल्लीच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे नेण्याची खताळ यांची राजकीय चतुराई चर्चेचा विषय ठरली आहे. संगमनेरकरांच्या विकासाच्या आशांना खऱ्या अर्थाने बुस्टर डोस मिळाला असून, येत्या काळात या मागण्यांवर केंद्राकडून काय निर्णय होतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.याप्रसंगी आमदार अमोल खताळ समवेत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे, आ. शिवाजीराव कर्डिले साहेब, आ. काशिनाथ दाते सर, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ.मोनिकाताई राजळे, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. आशुतोष काळे, आ. विक्रम पाचपुते यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते, ज्यामुळे या मागण्यांना अधिक राजकीय बळ मिळाले आहे.

किंगमेकर म्हणून कोणता प्रभाग चर्चेत,कोणता प्रभाग सर्वात छोटा,इच्छुकांनी आपल्या फिल्डिंग ला केली सुरुवात,कसा आहे कोणता प्रभाग वाचा सविस्तर;


​संगमनेर प्रति: दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा श्रीगणेशा अखेर झाला आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या हरकतींवर कठोर सुनावणी घेतल्यानंतर, अंतिम प्रभाग रचना तातडीने जाहीर केली आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले असून, 30 नगरसेवकांसाठी (15 प्रभाग, प्रत्येकी दोन जागा) मोठी राजकीय रणधुमाळी आता अटळ आहे.
​प्रभारी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ही रचना प्रसिद्ध करताच, पालिका निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुकांनी आपल्या 'फिल्डिंग'ला सुरुवात केली असून, मतदार याद्या अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हरकतींना मिळाली किंमत, पण बदलांवर 'किरकोळ'ची मोहोरनगरपालिकेने सुरुवातीच्या रचनेवर नोंदवलेल्या 33 हरकतींवर सुनावणी घेतली. हरकतींपैकी प्रभाग क्र. 2 मध्ये 17 आणि प्रभाग क्र. 9 मध्ये 5 हरकती सर्वाधिक होत्या. नागरिकांच्या भावनांचा विचार करून विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार रचनेत 'किरकोळ बदल' करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या बदलांनी नाराजी दूर झाली की नाही, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, हरकती फेटाळून न लावता त्यावर प्रक्रिया पूर्ण केल्याने आता निवडणूक आयोगाच्या पुढील कार्यवाहीला थेट सुरुवात झाली आहे. किंगमेकर म्हणून प्रभाग 13 ठरू शकतो, तर प्रभाग 2 सर्वात छोटा नवीन प्रभाग रचनेत लोकसंख्येतील विषमता पुन्हा एकदा चर्चेत आहे.सर्वाधिक मतदार (4904) प्रभाग क्र. 13 मध्ये आहेत. घोडेकर मळा, साईनगर आणि खुद्द नगरपरिषद परिसर याच प्रभागात समाविष्ट आहे. हा प्रभाग निवडणुकीच्या निकालात 'किंगमेकर' ठरू शकतो. सर्वात कमी मतदार (3968) प्रभाग क्र. 2 मध्ये आहेत. या प्रभागात ऑरेंज कॉर्नर, राम नगर, पद्मनगर परिसर समाविष्ट आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आता एकूण दोन नगरसेवक (एक पुरुष, एक महिला) असणार असल्याने, इच्छुकांना तडजोड करून युती करावी लागणार आहे. तसेच, मतदार यादी विधानसभेच्या यादीनुसारच असल्याने, 'नवीन' मतदारांना संधी नाही .

👉 अंतिम प्रभाग रचनेनुसार, 15 प्रभागांची लोकसंख्या आणि त्यात समाविष्ट प्रमुख भाग पुढीलप्रमाणे आहे:

प्रभाग क्र. 1 ) श्रमिक नगर, गोविंद नगर, गणेश नगर, जनता नगर 4136
प्रभाग क्र. 2) ऑरेंज कॉर्नर, कुंथुनाथ सोसायटी, सुयोग सोसायटी, राम नगर, पद्मनगर, सिध्दी विनायक सोसायटी 3968
प्रभाग क्र. 3 ) श्रमपरीहार कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर, मधुबन कॉलनी, पारीजात कॉलनी, भरत नगर, माऊली कृपा कॉलनी 4117
प्रभाग क्र. 4 )शिवाजी नगर, रेंगे गार्डन परीसर, मेहेर मळा, जाणता राजा मैदान परीसर, विद्या नगर, सौभाग्य मंगल कार्यालय 4539
प्रभाग क्र. 5 )जनतानगर, चैतन्यनगर, मार्केट यार्ड परीसर 4169
प्रभाग क्र. 6 )इंदिरानगर, सह्याद्री विद्यालय, सा. बां. विभाग शासकीय विश्राम गृह 4124
प्रभाग क्र. 7 ) देवाचा मळा, सावता माळी नगर, एस टी स्टैंड, पंजाबी कॉलनी, वकिल कॉलनी, अभंग मळा माळीवाडा, संजय गांधी नगर क्रिडा संकूल 4720
प्रभाग क्र. 8 )अभिनव नगर, एम.एस.ई.बी. कार्यालय, नविन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली 4433
प्रभाग क्र. 9 )कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, जुना बैल बाजार, ज्ञानमाता विद्यालय, गुंजाळ नगर, पंचायत समिती, पाबळे वस्ती, जब्बार मळा 4299
प्रभाग क्र. 10 )भारतनगर, रेहमतनगर, जम-जम कॉलनी, अलकानगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय, गलांडे मळा 4128
प्रभाग क्र. 11 )गवंडीपुरा कब्रस्तान, सय्यद बाबा चौक, देवीगल्ली, घासबाजार, उपासणी गल्ली, तेलीखुंट, लखमीपुरा 4568
प्रभाग क्र. 12 ) गांधी चौक, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदीर, अशोक चौक, मेन रोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा, कुंभार आळा, सैय्यदबाबा चौक 4549
प्रभाग क्र. 13 ) घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाणपुरा, जेधे कॉलनी, पुर्नवसन कॉलनी स्वामी समर्थ मंदिर, साळीवाडा, संगमनेर नगरपरिषद 4904
प्रभाग क्र. 14) रंगारगल्ली, जे. पी. रोड, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, नेहरू चौक, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अँग्लो उर्दू हायस्कुल, जुने पीडब्लुडी कार्यालय, नायकवाडपुरा मस्जिद व कब्रस्तान 4753
प्रभाग क्र. 15) रुबी टॉवर, नाईकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्ट्स ग्राऊंड, पुणे नाका, लखीमपुरा, रहमत नगर, फादरवाडी 4397 

या घोषणेने संगमनेर शहरातील राजकीय शांतता भंग झाली असून, प्रत्येक प्रभागातून उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. निवडणुकीची नेमकी तारीख कधी जाहीर होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज वसुंधरादिंडीचे  आमदार खताळ यांनी वृक्षारोपण करून केले स्वागत; नारीशक्तीच्या माध्यमातून देशाची व धर्माची यशस्वी वाटचाल;आ.खताळ


संगमनेर प्रति: दि, 3 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार ,आपण या काँग्रेसच्या जंगलात कुठेतरी बाजूला चाललो होतो मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा होणारा -हास थांबविण्यासाठी नांणीज धामचे जगद्गुगुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी सुरू केलेला एक पेड माँ के नाम हा अभिनव उपक्रम निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे,जगद्‌गुरू स्वामी रामानंदाचार्य उर्फ नरेंद्राचार्य महाराज यांचा रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधामला 21ऑक्टोबर 2025 रोजी  जन्मसोहळा होत आहे. त्या निमित्त उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त सहभागी असलेली वसुंधरा पायी दिंडीचे 29 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ  येथून प्रस्थान झाले आहे. ही दिंडी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आली असता आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी या दिंडीचे संगमनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.तसेच चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांनी  स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्धपादुकाचे दर्शन घेतले.त्यांच्या हस्ते व उत्तर अहिल्यानगर नगर जिल्ह्या तील भावीकभक्तांच्या प्रमुख उपस्थितीत  वृक्षारोपण करण्यात आले,या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे दिंडी प्रशासन प्रमुख सुभाष सानप ,उत्तर नगर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रकाश बेलापूरकर  राजशिष्टाचारप्रमुख व्यंकटेश बप्पा यांच्या सह अनेक भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,

--------------------------: चौकट :-------------------------------
नाशिक उपपिठाहुन नाणीजधाम येथे  स्वामी नरेंद्रचार्य महाराज जन्म सोहळा निमित्त जात असणाऱ्या वसुंधरा पायी दिंडीचे संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी स्वागत केले  त्यांनी  झाडे लावा... झाडे जगवा... पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा हा संदेश या वृक्षदिंडीच्या  माध्यमातून पोहोचून पर्यावरण जागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तो निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्या साठी उपयोगी पडेल असा विश्वास नीलम खताळ यांनी व्यक्त केला आहे,

----------------------------------------------------------------------स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तांना मार्गदर्शन करताना आ .खताळ म्हणाले की एक पेड आई के नाम ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तगणांनी पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वसुंधरा पायी दिंडी हा उपक्रम सुरू केला आहे. तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे स्वामी नरेंद्रा चार्य महाराज यांचा तुमच्या आमच्यावर कृपाशीर्वाद आहे.त्यांनी व त्यांच्याभावीक भक्तांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम सुरू केले आहे त्याचेच फळ विधानसभा  निवडणुकीत मिळाले आहे. आणि माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या संप्रदायातील भाविक भक्तांमुळे मिळालीआहे. या वृक्षदिंडीमध्ये लहानांपासून ज्येष्ठापर्यत आणि महिलां पासून पुरुषांपर्यंत सर्वच जण भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहे. मात्र या दिंडीमध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात  दिसून येत आहे नारीशक्तीच्या माध्यमातून देशाची व धर्माची यशस्वी वाटचाल  सुरू असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले,



मद्य विक्री वगळता सर्व व्यावसायिक आस्थापनांना २४ तास व्यवसाय करण्याची मुभा; सरकारचा ऐतिहासिक निर्णय काय? वाचा सविस्तर;


​मुंबई प्रति: दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत 'नाईट लाईफ (Nightlife) च्या नियमांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत, रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देणारे बंधन हटवले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ नुसार, मद्यविक्री आणि मद्यपुरवठा करणाऱ्या जागा वगळता राज्यातील दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहे आता रात्रभर, म्हणजे २४ तास खुली ठेवता येणार आहेत. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे, रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी, प्रवासी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी जेवण, खरेदी आणि आवश्यक सेवा सहज उपलब्ध होणार आहेत.

​                 रात्रीच्या व्यवसायाचे नियम काय?
या निर्णयानंतर रात्री उशिरा व्यवसाय करताना खालील मुख्य नियम पाळणे बंधनकारक असणार आहे:
​सेवा अखंडित: हॉटेल्स, उपाहारगृहे, करमणुकीची ठिकाणे आणि मॉल यांसारख्या आस्थापनांना आता रात्री १ वाजता किंवा १२ वाजता बंद करण्याची सक्ती नसेल. ते त्यांचे व्यवहार २४ तास सुरू ठेवू शकतात. कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्रथम: 'नाईट लाईफ'ला प्रोत्साहन देत असताना, सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दर आठवड्याला सलग २४ तासांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक असेल. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पाळ्यांचे नियोजन या नियमानुसार करणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद: महिलांना रात्री उशिरा (रात्री ९:३० नंतर) काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु आस्थापनांना त्यांच्या सुरक्षित प्रवासाची आणि कामाच्या ठिकाणी पुरेसे सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी घ्यावी लागेल
.

​                    यांना रात्रभर मुभा नाही: 

बार, परमिट रूम, डान्स बार, हुक्का पार्लर आणि मद्य विक्रीची दुकाने यांसारख्या आस्थापनांना पूर्वीचेच वेळेचे निर्बंध लागू राहतील. या निर्णयामुळे रात्रीची अर्थव्यवस्था (Night Economy) मजबूत होईल आणि मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरा व्यवसाय करताना, संबंधित आस्थापनांना केवळ महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ चे नियम पाळणे आवश्यक असेल


​----------------------------: सुचना :---------------------------------

हे वृत्त शासन परिपत्रक क्रमांक मदुआ-१२२५/प्र.क्र.१५६/ कामगार-१०, दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या माहितीवर आधारित आहे.​हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला आहे.

-------------------------------------------------------------------------

प्रशासनाकडे कठोर भूमिका घेण्यासाठी काय केली मागणी?जातीय तणाव आणि दंगलीतून केवळ घरांचे, दुकानांचे नुकसान होत नाही, तर? वाचा सविस्तर;



​अहिल्यानगर (पुणे ) : दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर मध्ये नुकत्याच घडलेल्या तणावपूर्ण घटनेमुळे संपूर्ण सामाजिक वातावरण हादरले आहे. शेकडो वर्षांची सर्व धर्म समभावाची परंपरा जपणाऱ्या या शहरात भीतीचे सावट पसरले आहे. ही घटना केवळ एका समाजाची नव्हे, तर आपल्या संपूर्ण मानवतेची जखम आहे, असे मत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), मुस्लिम आघाडीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने आज आजरोजी मा. ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडे कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.

​रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गटाकडून) प्रमुख मागण्या 

1) समाजात तेढ व वैमनस्य निर्माण करणाऱ्या खऱ्या दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. 2) निष्पाप व निरपराध नागरिकांवर अन्याय होऊ नये. 3) ज्यांचा रस्ता रोको आंदोलनामध्ये कोणताही सहभाग नाही, अशा लोकांवर कारवाई न करता पोलिसांनी अधिक दक्षतेने व पारदर्शकतेने काम करावे. 4) ​ ज्या व्यक्तींनी रस्त्यावर रांगोळी काढून धार्मिक भावना दुखावल्या आणि धार्मिक तणाव निर्माण केला, अशा 'बांडगुळांना' कठोर शिक्षा व्हावी.5) अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता प्रशासनाने सर्व समाजघटकांना एकत्र आणून शांती समित्या व संवादाचे व्यासपीठ त्वरित निर्माण करावे. 6) शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश देणारे उपक्रम नियमित राबवावेत.निवेदनात, जातीय तणाव आणि दंगलीतून केवळ घरांचे, दुकानांचे नुकसान होत नाही, तर माणुसकीचा पाया खचतो, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. समाजात दहशत, अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असताना प्रशासनाने ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.

​उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि अहिल्यानगरला पुन्हा एकदा शांतता, ऐक्य आणि सुरक्षिततेचा आश्वासक श्वास मिळेल. शहरात गुण्यागोविंदाने सर्व समाज नांदावेत, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केले आहे. सदर निवेदन देता वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मुस्लिम आघाडी पुणे शहर अध्यक्ष हाशिम शेख, तसेच नदीम मेमन, फिरोज शेख, अमित गायकवाड, सलाउद्दीन शेख, जावेद मेमन, सोनाली घुलावडे, सोनाली धोत्रे, सोनाली जोगडे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


✍️ हाशिम शेख

उपमुख्यमंत्र्यांच्या थेट हस्तक्षेपामुळे शास्ती माफी योजनेचा लाभ संगमनेरकरांना मिळणार,आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडूनही सकारात्मक मार्ग,आ खताळ


​संगमनेर प्रति: दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडथळे आता लवकरच दूर होणार आहेत! संगमनेरचे आक्रमक आमदार अमोल खताळ यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून हा प्रलंबित विषय मार्गी लावला. उपमुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने हजारो संगमनेरकर करदात्यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे 

                   नेमका काय होता अडथळा?
शासनाने अभय योजना जाहीर केली खरी, पण संगमनेर नगर परिषदेसमोर मोठी अडचण उभी राहिली होती. 31 मार्च 2025 पर्यंतची थकबाकी रक्कम शासनाच्या Integrated Web Based Portal (IWBP) वर दिसतच नव्हती. त्यामुळे ही 'शास्ती माफी फक्त कागदावर राहिली होती आणि नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या गंभीर प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी नगरपरिषद प्रशासनातील अडचणींसह पोर्टलवरील ही अपूर्ण नोंद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर फोनद्वारे मांडली. वेळेत दिलासा न मिळाल्यास करदात्यांवर मोठा अन्याय होईल, असे खताळ यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. आमदार खताळ यांची मागणी फोन वर गांभीर्याने ऐकून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी पुढील १० ते १५ दिवसांमध्ये शास्तीकर माफीच्या अंमलबजावणीतील तांत्रिक त्रुटी दूर करून ठोस निर्णय घेतला जाईल, असे ठाम आश्वासन दिले आहे. याशिवाय, आमदार खताळ यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडूनही सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन घेतले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे शास्ती माफी योजनेचा लाभ पुढील काही दिवसांत संगमनेरकरांना मिळणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार राहुल भोईर शशांक नमन उपस्थित होते

विद्यार्थ्यांच्या गैरसोयीवर मनसेचा 'गुंड' साहेबांना जाब; बससेवेतील त्रुटी त्वरित दूर करण्याची ग्वाही;





​संगमनेर प्रति: दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) बससेवेतील मनमानीचा मोठा फटका बसत होता. वारंवार बस लेट होणे, रद्द होणे किंवा डिझेल नसल्याचे कारण देत सेवा थांबवण्याच्या गंभीर तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उचलत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (MNVS) संगमनेर आगार प्रमुखांना कडक शब्दांत निवेदन दिले आहे,
​ओझर, उंबरी, आश्वी, प्रतापूर, दाढ, हसनापूर अशा अनेक गावांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा बस मिळत नव्हती. बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा-कॉलेज गाठणे अशक्य झाले होते. या गंभीर गैरसोयीची दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेने आगार प्रमुख श्री. गुंड साहेब यांना भेटून जाब विचारला
.मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा वाचताच आगार प्रमुख श्री. गुंड साहेब यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी यापुढे बससेवेतील अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा उपस्थित होणार नाहीत, तसेच वेळेवर बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी ठाम ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. सदर निवेदन देता वेळी उत्तर अहिल्यानगर मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, संगमनेर मनसे तालुका उपाध्यक्ष सुरजभाऊ तळेकर, विभाग अध्यक्ष कुणाल भुसाळ, यश भुसाळ, सार्थक खेमणर, तुषार मगर, अमोल आंधळे, साहिल रणदीर, प्रतीक पंडित व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या या दणक्यानंतर आता ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत होणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

आपल्या आया बहिणींना लव्ह जिहादच्या बळी पडू देऊ नका धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा.पेमगिरी येथील शहागडावर नवरात्र उत्सव निमित्त आ खताळ यांच्या हस्ते प्रेमादेवीची महा आरती;


संगमनेर प्रति:दि.1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना ठराविक महापुरुषांचा इतिहास शिकवला गेलामात्र आता हिंदुत्वासाठी आणि धर्मरक्षणासाठी काम करणाऱ्या किर्तनकारांनी नारदाच्या गादिवरून हिंदू धर्माबाबत प्रबोधन सुरू केले आहे. ही एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ठ आहे. येथून पुढील काळात देश आणि धर्म टिकविण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी तरुणांना दिला आहे, दि, 30 सप्टेंबर2025 रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडावरती आयोजित नवरात्र उत्सवा निमित्त अनिल महाराज देवळेकर यांची कीर्तन आयोजित केले होते या कीर्तनाला आमदार अमोल खताळे यांनी हजेरी लावली त्यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना आ खताळ बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अनिल महाराज  देवळेकर भाजपचे उपाध्यक्ष दिलीप कोल्हे प्रमोद डुबे दत्ता वनपत्रे हौशीराम महाराज कोल्हे सुधीर शिंदे संदीप डुबे अनिल डुबे सुभाष कोल्हे प्रवीण पावसे स्वप्निल डुबे निखिल दीक्षित दत्ता शेटे देवेंद्र डुबे ज्ञानेश्वर चव्हाण रवींद्र डुबे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,

--------------------------: चौकट :---------------------------------
हिंदू म्हणून जगणार अन हिंदू म्हणूनच मरणार असे औरंगजेबाला दरडावून सांगणारे जगातील एकमेव राजे छत्रपती संभाजी महाराज हे  होते.छत्रपतीसंभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल हाल करून मारत असतानाच्या प्रसंगाचे वर्णन उपस्थितांसमोर हावभाव करून करत असताना  अनिल महाराज देवळेकर आणि उपस्थित भक्तगणांना अक्षरशः गहिवरून आले होते,
-------------------------------------------------------------------------आ, खताळ म्हणाले की मी हिंदू आहे आणि मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे त्यामुळे मी आमदार असलो तरी हिंदुत्वासाठी कायम काम करत राहीन. पेमगिरीचा महाकाय वड आणि शहागड या परिसराचा सर्वांगीण विकास करण्या साठी माझा प्रयत्न राहणार आहे. यावर्षी च्या नवरात्रीमध्ये अर्ध्या भागातील स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुटला आहे .मात्र पुढील वर्षीच्या नवरात्रामध्ये गडाच्या पायथ्या पासून ते  टोकापर्यंत संपूर्ण स्ट्रीट लाईट  केली जाईल आणि या गड परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल असा विश्वास आ खताळ यांनी व्यक्त केले हिंदू धर्म प्रचारक देवळालकर महाराज म्हणाले की जो धर्मरक्षणासाठी पुढेराहतो त्याच्यामागे आपण सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. हिंदू धर्मासाठी तरुणांनी पेटून उठावे, आपल्या आया बहिणींना ‘ लव्ह जिहादच्या बळी पडू देऊ नका धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा.असा सल्ला दे या पेमगिरी गावातून कट्टर हिंदुत्ववादी तरुण या गावातून निर्माण झाले पाहिजेत हिंदु त्वासाठी आमदार अमोल खताळ यांनी गावागावात  प्रामाणिकपणे काम करत आहे . त्यांच्या मागे सर्वांनी भक्कम उभे राहावे असे आवाहन देवळालकरमहाराज यांनी केले


 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget