September 2025

शांतता भंग करण्याचा कट? DySP सोनवणे यांना मुस्लिम समाजाचे निवेदन, मुख्य आरोपी सह 29 संशयित ताब्यात;




​संगमनेर/अहिल्यानगर: दि 29 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अहिल्यानगर शहरात (पूर्वीचे अहमदनगर) धार्मिक सलोख्याला गंभीर आव्हान देणारी आणि तेढ निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मियांच्या आदरणीय प्रेषितांचे नाव रस्त्यावर रांगोळीने लिहून त्यांची अवहेलना केल्याची तक्रार आहे. या निंदनीय कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून, त्याचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत.

संतप्त झालेल्या संगमनेर शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने डीवायएसपी (DySP) सोनवणे यांना तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे.

​        घटनास्थळी लाठीचार्ज; मालमत्तेचे मोठे नुकसान

निवेदनात नमूद केल्यानुसार, या कृत्याचा विरोध दर्शवण्यासाठी मुस्लिम समाजबांधव रस्त्यावर उतरले. मात्र, याच दरम्यान जमावावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या संघर्षामुळे खाजगी तसेच शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेने शहरातील शांतता भंग झाली असून, सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.

​     राष्ट्रीय एकात्मतेला धोका': कठोर कारवाईची मागणी

मुस्लिम समाजाने भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुता या मूल्यांचा आधार घेत घटनेची तीव्रता प्रशासनासमोर मांडली आहे. सदर बाब ही केवळ धार्मिक तेढ निर्माण करणारी नाही, तर ती राष्ट्रीय एकात्मतेला देखील धोका निर्माण करणारी असल्याने याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही," असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
​शहरात शांतता भंग करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर त्वरित अजामीनपात्र (
Non-bailable) कलमांखाली कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी डीवायएसपींकडे करण्यात आली आहे.
​धार्मिक अवहेलनेच्या या कृत्यामुळे अहिल्यानगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर सदर प्रकरणात वेगवेगळे गुन्हे देखील झाले आहेत, रांगोळी काढणाऱ्या मुख्य गुन्ह्यातील आरोपी
संग्राम आसाराम रासकर याला पोलिसांनी अटक केली असून लाठीचार्ज नंतर जमावातील तब्बल 29 संशयित आरोपी देखील ताब्यात घेतल्याचे प्रेस नोट च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने सांगितले आहे त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणात आणखी कोणती कठोर भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपासून दफन झालेले खुनाचे भयानक सत्य स्थानिक गुन्हे शाखेने आणले बाहेर! एका निरपराध महिलेचा खून कोणत्या रागातून?


​अहिल्यानगर प्रति:दि 28 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, तू माझा नवरा आहे एवढेच बोलणे एका भिकारी महिलेच्या जीवावर बेतले! शिर्डी परिसरात दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका क्रूर खुनाचा धक्कादायक उलगडा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. सामाजिक बदनामीच्या क्षुल्लक रागातून एका 28 वर्षीय तरुणाने महिलेचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह दगडाच्या खाणीत फेकून दिला होता, ​19 मार्च 2024 रोजी सावळीविहीर बु. येथील के.के. मिल्क जवळील दगडाच्या खाणीत एका अनोळखी, निष्पाप महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पहिल्यांदा हा केवळ अपघात असल्याचे भासवले गेले, परंतु शवविच्छेदन अहवालाने पोलिसांचे डोळे उघडले,हा गळा आवळून केलेला थंड डोक्याचा खून होता.

पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आणि स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्या आदेशानुसार LCB चे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हवालदार विजय पवार,रमिझरजा आतार,सुनील मालणकर, हद्य घोडके, लक्ष्मण खोकले, दीपक घाटकर,भगवान धुळे यांचा समावेश होता (LCB)च्या या विशेष पथकाने 
रात्रीचा दिवस करत तपास सुरू केला. ​सततच्या आणि कसून केलेल्या तपासाअंती, पथकाने आकाश मोहन कपिले (वय 28, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी) या नराधमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दिलेली कबुली ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला!
आकाश शिर्डी बसस्टँडवर प्रवासी बुकींगचे काम करायचा. भिक्षा मागणाऱ्या अनोळखी महिलेला त्याची सततची चेष्टा करण्याची सवय होती. ती त्याला वारंवार 'अरे तू माझा नवरा आहे, असे लोकांमध्ये ओरडून बोलत असे. यामुळे होणारी असह्य बदनामी आणि लोकांकडून होणारी चेष्टा आकाशला सहन झाली नाही. या विकृत मानसिकतेतून त्याने महिलेचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.आणि 17 मार्च 2023 रोजी त्याने आपल्या मोपेड (MH17BW6950) वर बसवून तिला सावळीविहीरच्या निर्मनुष्य खाणीत नेले. तेथे कोणताही विचार न करता तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह खाणीच्या खोल पाण्यात फेकून दिला. दोन वर्षांपर्यंत त्याने हा गुन्हा पोटात दडवून ठेवला होता. एका निरपराध महिलेचा खून केवळ सामाजिक चेष्टेच्या रागातून झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आरोपी आकाश कपिले यास दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं 287/ 2024 भादवि कलम 302 / 201 प्रमाणे दाखल प्रकरणी हजर करण्यात आले आहे तर कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार नाही, अशी खात्री पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे तर सदरची दमदार कारवाई ही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली केले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे

 निसर्गाचा कोप, नेत्याची तळमळ,या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मातेनेच बळ द्यावं,राजकीय सांत्वन नव्हे, आध्यात्मिक आधार;थोरात

​संगमनेर प्रति: दि.28 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, महापुराने हादरलेल्या सादतपूरसह संपूर्ण तालुक्यात एकीकडे हाहाकार माजलेला असताना, दुसऱ्या बाजूला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात देवी गल्लीतील श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी त्यांनी आपल्यासाठी काहीही न मागता, केवळ पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी 'संकटातून सावरण्याची शक्ती' मागितली. नुकत्याच आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे संगमनेर तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः शेतकरी बांधवांचे पीक आणि घर-संसार उद्ध्वस्त झाली आहेत. या वेदनादायी पार्श्वभूमीवर, बाळासाहेब थोरात यांनी केवळ राजकीय भेटीगाठी न ठेवता, साक्षात मातेच्या चरणी शेतकऱ्यांसाठी भावनिक साकडं घातलं आहे.या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी मातेनेच बळ द्यावं, ही त्यांची कळकळीची प्रार्थना होती. त्यांच्या या भूमिकेमुळे, एका लोकनेत्याची जनतेप्रती असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते. बाळासाहेब थोरात यांनी केवळ दर्शन घेऊन शांत बसले नाहीत. त्यांच्यासोबत नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे डॉ. जयश्री थोरात निखिल पापडेजा यांसारखे महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर जनतेच्या दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांना आध्यात्मिक बळ देण्याची एक गंभीर कृती होती.त्यांनी मातेच्या चरणी सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचीही प्रार्थना केली.थोडक्यात, संकटात सापडलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तात्काळ सरकारी मदत कधी मिळणार? हा कळीचा प्रश्न असताना, थोरात साहेबांनी मात्र मातेच्या आशीर्वादाने त्यांना नैतिक आणि मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रशासनाने या 'आध्यामिक आधारा'ला 'आर्थिक मदतीची' जोड देणं अपेक्षित आहे.

निसर्गाचा कोप सादतपूरमध्ये महापूर, मा.मंत्री थोरातांचा मायेचा आधार बोरसे वस्तीला दिलासा;



​संगमनेर प्रति:दि 28 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावावर आज निसर्गाने अक्षरशः सूड उगवला आहे, ढगफुटीसदृश्य पावसाने आलेल्या महापुराने संपूर्ण गावाला वेढले, आणि त्यात बोरसे वस्तीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालेलं पाहून इथल्या मायबाप नागरिकांच्या काळजाला पीळ पडला आहे. शेकडो कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून मदतीची गरज असताना प्रशासनाचे घोडे कधी धावणार, हा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ​संकटकाळी ​या बिकट आणि संतापजनक परिस्थितीत, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केवळ नेता म्हणून नाही, तर एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती मिळून आली आहे.बाळासाहेब थोरात हे पहाटेपासूनच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि तातडीने प्रशासनाला मदतीसाठी कडक सूचना दिल्या होत्या.तर त्यांच्या एका हाकेवर कार्यकर्ते सकाळपासूनच सादतपूरमध्ये तळ ठोकून मदतीसाठी उतरले असल्याचेही एकंदरीत चित्र दिसून आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधाराचा शब्द दिला. तसेच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनीही तातडीने गावात धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.त्यामुळे ​या दुःखाच्या क्षणी बाळासाहेब थोरात यांनी राजकीय सांत्वनाची औपचारिकता टाळली, आणि केवळ मायेचा आधार देण्याचे काम केले असल्याचं बोललं जातं आहे. 

त्यांनी कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला केवळ सूचना दिल्या नाहीत, तर या संकटात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच, सहकारी संस्थांच्या संपूर्ण यंत्रणेला त्यांनी सतर्क राहण्याचा स्पष्ट आदेशही दिला आहे.
​सादतपूरवर ओढवलेल्या या संकटात, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे माणुसकीचा ओलावा अजूनही जिवंत असल्याची ग्वाही मिळाली. आता पंचनाम्याचे काम तातडीने सुरू करून, नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ आणि भरीव मदत कधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व सौ, शहरी तो एक संगमनेरीच्या ग्रुप ॲडमिनला ऐतिहासिक सन्मान;



​संगमनेर प्रति: दि 28 सप्टेंबर2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील आपल्या निर्भीड भूमिकेसाठी ओळखले जाणारे तसेच सौ शहरी तो एक संगमनेरी या लोकप्रिय व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन असलेले संजय क्षत्रिय उर्फ बंडूशेठ यांची 2026 साठीच्या संगमनेर येथील अत्यंत मानाच्या हजरत सय्यद शहा बाबा उर्स कमिटीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मोगलपुरा ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे संगमनेरच्या ऐतिहासिक हिंदू-मुस्लिम ऐक्याला आणखी बळकटी मिळाली असून, सर्व स्तरांतून या निवडीचे उत्साहाने स्वागत होत आहे.बंडूशेठ यांचा व्हॉट्सॲप ग्रुप नव्हे तर हक्काचं व्यासपीठच आहे संजय क्षत्रिय हे केवळ संगमनेर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि सामाजिक कार्यामुळे परिचित आहेत. त्यांनी सुरू केलेला सौ शहरी तो एक संगमनेरी हा व्हॉट्सॲप ग्रुप आज संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सर्व समाज बांधवांसाठी हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. वेगवेगळ्या धार्मिक विचारधारेचे लोक, विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, तसेच विविध पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि कार्यकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणून आपले विचार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. बहुतांश ​शहरातील व तालुक्यातील विविध समस्या याच ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न बंडूशेठ नेहमी करत आले आहेत. त्यांचा हा समन्वयवादी आणि सर्वसमावेशक स्वभावच त्यांच्या निवडीमागे महत्त्वाचा ठरला आहे. ​सय्यद बाबांचा उरूस हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जागतिक प्रतीक आहे.संगमनेर शहराच्या मध्यभागी असलेले हजरत सय्यद शहा बाबा दर्गा हे केवळ (देवस्थान )नसून ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे महत्त्वपूर्ण आणि जागृत प्रतीक म्हणून ओळखले जाते. या दर्ग्याचा उरूस (जत्रा ) हा संगमनेरच्या ऐतिहासिक नगरीतील एक मोठा आणि महत्त्वाचा सोहळा मानला जातो, ज्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळते. ​सन 2026 च्या उर्स कमिटीवर मोगलपुरा ट्रस्टने अध्यक्ष व सदस्यांची निवड करताना सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी टिकून राहावे या उदात्त हेतूने संजय क्षत्रिय उर्फ बंडूशेठ यांची निवड केली. या निवडीमुळे दर्गा कमिटीमध्ये आता समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व झाले आहे. सय्यद बाबा ऊस कमिटी 2026 करिता अध्यक्ष शेख गफ्फार अब्दुल लतीफ यांची तर कमेटी सदस्य पदी बंडूशेठ क्षत्रिय यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे संगमनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले बघण्यास मिळाले आहे. त्यांचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियासह (फेसबुक, व्हॉट्सॲप) तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही निवड केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा गौरव असल्याचे मानले जात आहे. एवढं मात्र नक्की,

✍️:कार्यकारी संपादक,एस.पठाण

त्यांना आता महा पुरुष आठवायला लागले आमदार खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला टोला,राजे उमाजी नाईक यांची जयंती आमदार खताळ यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात;


संगमनेर प्रति: देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. मात्र त्या क्रांति कारकांचा इतिहास झाकण्याचा काँग्रेस सरकारने प्रयत्न केला हे फार मोठे दुर्दैव आहे. मात्र त्याला खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्य मातून झाले असल्याचे परखड मत आ अमोल खताळ यांनी मांडले जय मल्हार क्रांती या संघटनेच्यावतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ जनसंपर्क कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरामध्ये बसस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बस स्थानकावर आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते या वेळी व्यासपीठावर श्रीरामपूरचे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष रोहिदास मदने नाशिक जिल्हाध्यक्ष मतेश जेडगुले शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोदसूर्यवंशी भाजपतालुका अध्यक्ष गुलाब भोसले शहराध्यक्ष पायल ताजणे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे भारत गवळी दिलीप रावळ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले जिल्हा सचिव भारत गोफणे दत्तू गोफने तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण युवक अध्यक्ष सागर जेडगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,आ खताळ म्हणाले की आद्य क्रांति कारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.राजे उमाजी नाईकांनीफक्त रामोशी समाजबांधवांना न्याय दिला नाही तर  सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नकेला आहे. त्यामुळे रामोशी समाजबांधवांनी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढं मार्गक्रमण करावे ज्या पद्धतीने  रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत गनिमी काव्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष ळरत त्यांना सळो की पळो करून सोडले .तसाच गनिमी कावा या समाजबांधवांनी विधानसभा निवडणुकी मध्ये वापरत आम्ही कोणाच्या दबावाला व  दहशतीला घाबरणारे नाही हे दाखवून देत हा सर्व समाज महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. गेली कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात विशेषता संगमनेर मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्या वेळी फक्त ठराविक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे संगमनेर मध्ये साजरे होत होते.मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्या नंतर सर्वच राष्ट्रमहापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्याचे भाग्य मला मिळालेआहे  प्रत्येक समाजघटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम आपण करत आहोत. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असाही विश्वास आमदार खताळ व्यक्त केला .जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहिदास मदने शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर आभार मच्छिंद्र गुळवे यांनी मानले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले

 -----------------------{ चौकट }--------------------------

रामोशी समाजाचा येथून मागे काहींनी फक्त मतासाठीच वापर केला गेला. मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन माझ्या पाठी मागे भक्कम उभे राहत परिवर्तन केले आहे त्यामुळे त्यांना आता महापुरुष आठवायला लागल त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते आता-५ ऑक्टोबरला राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करणार आहे असे समजले आहे याचा आम्हाला आनंद आहे.आम्ही सर्वच राष्ट्र महापुरुषां च्या जयंती उत्सव साजरे करू लागलो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांना आता महा पुरुष आठवायला लागले असल्याचाटोला आमदार खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे,

-------------------------------------------------------------

रामदास कोकरे गेले,दयानंद गोरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचे फलक झळकले, पोलीस खात्यातही खळबळ;



​संगमनेर,प्रति: दि.27 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि शैक्षणिक केंद्र म्हणून गौरवल्या जाणाऱ्या संगमनेर शहराची प्रतिमा आता राजकीय दबावामुळे धोक्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील प्रशासकीय कामकाजात वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांवर होणारा मानसिक व आर्थिक दबाव, यामुळे शहरातून अनेक कार्यक्षम अधिकारी काढता पाय घेत आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम शहराच्या विकासावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनीही याच दबावाला कंटाळून संगमनेर सोडले. त्यांची नियुक्ती शहरात शिस्त आणण्यासाठी झाली होती, मात्र त्यांनाही राजकीय शक्तीपुढे नमते घ्यावे लागले. त्यांच्या जाण्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.याआधीही, याच प्रकारच्या दबावामुळे तहसीलदारांना तीन महिन्यांची रजा घ्यावी लागली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे नवीन रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांना पहिल्याच दिवशी 'खरपूस समाचार' मिळाल्याने, ते किती मनापासून काम करतील, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. आता तर, उपविभागीय पोलीस अधिकारी देखील बदलीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मकता पसरली असून, आगामी काळात शहरात चांगले अधिकारी येण्यास कचरतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे सर्व पाहता, संगमनेरच्या शांत आणि सुसंस्कृत प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमडी पावडर, नशेचे इंजेक्शन, कुत्ता गोळी, गांजा, गुटखा अशा विविध अवैध धंद्याने शहराला विळखा घातला आहे, तर राजकीय स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या चुकीच्या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही तर, शहराची प्रगती थांबेल आणि सामाजिक सलोखाही बिघडण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे ही काळाची गरज बनली आहे.राज्यातील अनेक शहरांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकरे संगमनेरमध्ये मात्र आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. ते कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी मार्ग काढतील, अशी अपेक्षा संगमनेरकरांना होती. त्यांनी सुरुवातीपासून तसे प्रयत्नही केले, मात्र त्यांच्या कामकाजात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते येथे फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. तसेच, शहरातील फ्लेक्स कारवाईसह अन्य काही विषयांवरूनदेखील ते अडचणीत सापडले असल्याची चर्चा शहरात होती. यामुळे कोकरे यांनी शहरातील फ्लेक्स कारवाईवर मौन बाळगले होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात सर्वत्र फ्लेक्स युद्ध रंगले होते. असे असले तरी, एक चांगला अधिकारी म्हणून आपली प्रतिमा त्यांनी जनसामान्यांमध्ये निर्माण केली होती.कोकरे यांचा संपूर्ण कार्यकाळ प्रशासकीय कालावधीत गेल्याने त्यांचा नगरसेवकांशी फारसा संबंध आला नाही. त्यामुळे थेट निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती, मात्र त्यांच्या निर्णयाला सातत्याने लगाम घातला गेल्याचे बोलले जाते. त्यातच संगमनेरच्या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचे देखील चर्चा होती. अखेरीस राज्य शासनाने कोकरे यांची संगमनेरमधून बदली केली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर पाठविण्यात आले असून, त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दोन वर्षांसाठी आहे. कोकरे यांच्या बदलीने संगमनेरचे मुख्याधिकारी पद रिक्त झाले असून, या पदावर शासनाने अद्याप अधिकृतपणे कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. मात्र अकलूज नगर परिषदेत वारकरी संप्रदायात आपला ठसा उमटविलेले दयानंद गोरे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनचे शुभेच्छा फलक झळकले आहे तर संगमनेरच्या पोलीस खात्यातही बदलीच्या वाऱ्याचं तुफान उठल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत,

श्रमिक ज्युनियर कॉलेज आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा,वैयक्तिक स्पर्धांमध्ये कठोर संघर्ष करून कुणाचा झाला विजय:



​संगमनेर प्रति: दि 20  सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील श्रमिक ज्युनियर कॉलेज येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धकांना धूळ चारत प्रचंड यश मिळवले आहे. आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर या विद्यार्थ्यांनी मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले आणि तीन खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान पक्के केले.

      वैयक्तिक स्पर्धांमध्ये कठोर संघर्ष आणि विजय

मोहम्मद रजा एजाज शेख (१७ वर्षांखालील गट) याने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वेगवान धाव घेत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

फैज इरशाद शेख (१७ वर्षांखालील गट) याने हातोडा फेकीत (Hammer Throw) आपली ताकद दाखवत तालुक्यात द्वितीय स्थान मिळवले.

​शोएब शकील शेख (१७ वर्षांखालील गट) याने ५ कि.मी. चालण्याच्या स्पर्धेत चिकाटीने चालत तालुक्यात द्वितीय क्रमांक घेतला.या तिन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.         सांघिक स्पर्धेतही एकहाती वर्चस्व:

केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सांघिक स्पर्धांमध्येही नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने प्रतिस्पर्धकांचा कस काढला. १४ व १७ वर्षांखालील गटातील ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत त्यांनी एकजुटीने धाव घेत तृतीय क्रमांक मिळवला.
​१४ वर्षांखालील संघ: फजिल मुदस्सीर सिद्दीकी, आयान नसिबउल्ला खान, अरसलान अझहर सय्यद, अरशान पठाण, जैश नईम पठाण.
​१७ वर्षांखालील संघ: मोहम्मद रजा एजाज शेख, फैज इरशाद शेख, शोएब शकील शेख, अबुजर इब्राहिम पठाण.
​सत्कार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा:
​या सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे प्रभारी नाजिम सर, प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. या खेळाडूंनी शाळेचे नाव उंचावले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

महायुती सरकारचा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा,राज्यातील ७५अपूर्ण आणि १५५पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणाली मध्ये सुधारणा


संगमनेर प्रति: महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातीलस भोजापूर प्रकल्पाच्या कामाकरीता  कामाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  नेतृत्वाखाली आणि  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून अधिकचा ३०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ.अमोल खताळ यांनी दिली.भोजापूर लाभक्षेत्रा तील शेतकर्याच्या दृष्टीने दिलासा देणारा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ७५अपूर्ण आणि १५५पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणाली मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व सातत्याने  केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पाच्या कामांना महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असून यामध्ये भोजापूर प्रकल्पाचा समावेश केल्याबद्दल आ.अमोल खताळ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.या निर्णयाची सविस्तर माहीती देतांना आ.अमोल खताळ म्हणाले की, तालुक्यातील भोजापूर चारीचा प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित होता.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर चारीची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देवून प्रथम पाणी आणण्यात यश आले.या चारीच्या कामाला राज्य सरकारने १४कोटी रुपये मंजूर केले होते.महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमात नव्याने या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला,या प्रकल्पाच्या वितरण प्रणालीसाठी नव्याने ३०कोटी रुपये देण्याचा ऐतिहसिक निर्णय झाल्याने तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाचा मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकर्यांना यापुर्वी फक्त आश्वासन मिळाले होते.मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष निधीची उपलब्धता करून कामाला सुरूवात होत असल्याने शेतकऱ्यांना नवा विश्वास महायुती सरकारने दिला.विधानसभा निवडणुकीपुर्वी पूर चारीला पाणी देणार हा दिलेला शब्द मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेला.आता नव्याने निधीची तरतूद करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळण्यासाठी महायुती सरकारने घेतलेला निर्णय या भागात सामाजिक परीवर्तन घडविण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

स्थानिकांच्या निवेदनांकडे कुणी केले होते दुर्लक्ष? अवघ्या १५ ते २० दिवसांत कसे झाले काम पूर्ण?


संगमनेर प्रति: दि,19 सप्टेंबर2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या लखमीपुरा मुस्लिम कब्रस्तानच्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या सुशोभीकरण कामाला अखेर यश आले आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षे केवळ आश्वासनांवर राहिलेले हे काम माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई जागीरदार यांच्या पुढाकाराने अवघ्या १५ ते २० दिवसांत पूर्ण झाले. या कामात कब्रस्तानमधील लाईटिंग आणि रस्त्यांची दुरुस्ती यांचा समावेश आहे.                       स्थानिकांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष

यापूर्वी स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने व तक्रारी अर्ज दाखल केले होते, परंतु त्याची कधीही दखल घेतली गेली नाही. यानंतर, लखमीपुरा येथील रहिवासी इरफान पठाण (पप्पू) आणि गफ्फार शेख यांनी जावेद भाई जागीरदार यांची भेट घेऊन कब्रस्तानचे काम मार्गी लावण्याची विनंती केली. जागीरदार यांनी तात्काळ हे काम हाती घेतले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केले.                     नगरपालिकेच्या माध्यमातून काम

हे काम संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले असून, यात इरफान पठाण (पप्पू) आणि गफ्फार शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे काम पूर्ण झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या  कौतुकास्पद कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी, लखमीपुरा ट्रस्ट आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत जावेद भाई जागीरदार यांचा सत्कार केला. यावेळी जिलानी शेख (बाबा भाई), शकुर शेख, रऊफ शेख, नासिर खान, परवेश सय्यद, अजिज शेख, मोबीन शेख, अशपाक शेख, मजहर भाई शिव सेना आणि अब्दुल बारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर गुड्डू इंजिनिअर (मुजंम्मील शेख यांनी मा.जावेद भाई जहागीरदार यांचे समस्त समाजबांधवांच्या वतीने आभार देखील मानले आहे,

लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रोन सफायरच्या सॅफ्रोन उत्सवाचा शुभारंभ,धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणे गरजेचे,आ,खताळ;


संगमनेर प्रति: ज्याप्रमाणे लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीने जानेवारी महिन्यात बिजनेस एक्सप्रेस भरविला जातो त्या एक्स्पोला लाखोंनी संगमनेरकर सहभागी होऊन खरेदीचा आनंद घेत असतात असाच खरेदीचा आनंद सॅफ्रोन उत्सवा च्या माध्यमातून संगमनेरकरांनी घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे,नवरात्र आणि दिवाळीचे औचित्य साधून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रोन सफायरच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर च्या पाच दिवस मालपाणी लॉन्स या ठिकाणी फन फूड व शॉपिंग सॅफ्रोन उत्सव आयोजित करण्यात आला आहे या शॉपिंग सॅफ्रोन उत्सवाचे उद्घाटन आ अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जीएटी कोऑर्डिनेटरसुनिता मालपाणी,  क्लबचे संस्थापक अध्यक्ष पीएमसीसी एमजेएफ गिरीश मालपाणी प्रकल्प समन्वयक श्रीनिवास भंडारी अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख कल्याण कासट प्रकल्प प्रमुख अतुल अभंग पूजा मर्दा कृतिका पडतानी सचिव सुमित मनियार खजिन दार नामदेव मुळे आदी मान्यवर उपस्थित होते,आमदार खताळ म्हणाले की लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीने जानेवारी महिन्यात होणाऱ्या बिझनेस एक्सपोसाठी लायन्स क्लब सफायरवर विश्वास ठेवून पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणाहून व्यावसायिक संगमनेरला येत असतात. या एक्सपोला लाखोच्या संख्येने संगमनेरक नागरिक भेट देत असतात आणि  खरेदी करत असतात त्यामुळे निश्चितच त्या व्यवसायिकाला आपला माल विकला गेला असल्याचा आनंद होत असतो. यावर्षी लायन्स क्लब सफायर सॅफ्रोनच्या वतीने प्रथमच पाच दिवसीय हा सॅफ्रोनउत्सव भरविला असून पुणे नाशिक मुंबई आणि संगमनेर येथून जवळजवळ ८० स्टॉल बुकिंग झालेआहे  हे एकूण मनाला समाधान वाटले आहे तुमच्यावर एक विश्वास ठेवून हे सर्वस्टॉल धारक सहभागी झालेले आहेत. त्यांना निश्चितच या सॅफ्रोन उत्सवाचा फायदा होईल असा आशावाद आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

-----------------------------चौकट-------------------------------------
लायन्स क्लब सफायरचे नाव राम मंदिर झाल्यानंतर बदलून ते  सॅफ्रोन करण्यात आले असल्याचे एकूण तुम्ही भगव्याचे काम सुरू केले आहे ही चांगली गोष्ट आहे धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणे गरजेचे असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------

यावेळी लायन्स क्लब सफायरचे प्रमुख गिरीश मालपाणी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनिता मालपाणी सॅफ्रोन  सफायर चे अध्यक्ष कल्याण कासट यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रकल्प प्रमुख अतुल अभंग यांनी केले स्वागत लायन्स क्लबचे प्रमुख गिरीश मालपाणी यांनी केले  सूत्रसंचालन सुदीप हासे यांनी केले तर आभार सचिव सुमित मणियार यांनी मानले या प्रकल्पासाठी प्रकल्प समिती सदस्य महेश डंग धनंजय धुमाळ उमेश कासट ,राजेश रा मालपाणी  सुदीप हासे प्रशांत गुंजाळ अक्षय गोरले देविदास गोरे जितेश लोढा रोहित मणियार चंद्रशेखर गाडे अजित भोत निलेश ओहरा अनिरुद्ध डिग्रसकर सुमित अट्टल कृष्णा असावा संतोष अभंग डॉ योगेश गेठे वेंकटेश लाहोटी नयन पारखं अतुल कोटकर आदित्य कडलग धनंजय फटांगरे नम्रता अभंग प्रियंका कासट चैताली जोर्वेकर मीनल अभंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.




जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही,Sp.घार्गे, पोलिसांना पाहताच चालकांनी काढला पळ,



कोपरगाव प्रति: दि 15 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत दोन अवैध वाळूने भरलेले टेम्पो पकडण्यात आले असून, २२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोना भिमराज खर्से, राहुल डोके, पोकॉ प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर आणि मनोज साखरे यांचा समावेश होता. हे पथक कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीची माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली.त्या माहितीनुसार, माहेगाव देशमुख शिवारातून गोदावरी नदीपात्रातून दोन टेम्पोमधून वाळूची अवैध वाहतूक केली जाणार होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल दिलीप विघे (वय २७) आणि कृष्णा संजय सोनवणे (वय २६) अशी आहेत. चौकशीत अमोल विघे हा टेम्पोचा चालक-मालक असल्याचे समोर आले, तर कृष्णा सोनवणेच्या टेम्पोचा मालक सचिन जाधव हा फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कारवाईत पोलिसांनी दोन्ही टेम्पो आणि त्यातील वाळू असा एकूण रु. २२,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते,राजहंस संघाचे वैशिष्ट्य आजही गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हेच आहे; 


​संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर2025 रोजी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (राजहंस) ची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी खास उपस्थिती लावून सभासद, दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
​यावेळी, राजहंस दूध संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांचा आणि सर्वाधिक वैयक्तिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार सोहळा दूध उत्पादकांच्या योगदानाला गौरवणारा होता.

​         दूध व्यवसाय संगमनेरचा आधारस्तंभ

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दूध व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून, तो आता येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनला आहे. राजहंस दूध संघ गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संघ नेहमीच विविध योजना राबवत असतो. केवळ उच्चांकी भावच नाही, तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळेही राजहंस संघाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे.
​थोरात यांनी पुढे सांगितले की, आज तालुक्यात दररोज तब्बल नऊ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते, हे येथील कष्टाळू शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. गुणवत्ता हीच या तालुक्याची ओळख आणि अभिमानाचे प्रतीक आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात दूध व्यवसायाचा पाया रचला, ज्यामुळे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार मिळाला असुन राजहंस दूध संघाची ५० वर्षांकडे होत असलेली वाटचाल हि निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. सहकारी दूध संघामुळे खाजगी दूध संस्थांवर नियंत्रण राहते आणि शेतकऱ्यांचे हित जपले जाते, असे थोरात यांनी अधोरेखित केले. त्यामुळे, सर्वांनी मिळून या संघाचे जतन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राजहंस संघाचे वैशिष्ट्य आजही गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हेच आहे,

      या मांन्यवर मंडळींची होती उपस्थिती

कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर मा. आ.डॉ. सुधीरजी तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर,अँड माधवराव कानवडे, सौ संगमनेर नगरपालिकेच्या प्रथम महिला मा.नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग पा. घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी राहणे, इंद्रजीत भाऊ थोरात, अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, के. के. थोरात, गणपतराव सांगळे, रामदास पा वाघ, सुभाष आहेर, सुनील कडलग, अविनाश सोनवणे, शेळी मेंढी पालन संघाचे डॉ गंगाधर चव्हाण, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू पा. ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ प्रतिभा जोंधळे, भारत शेठ मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी,आदी सभासद शेतकरी बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धोबी पछाड" डावाने चितपट करत त्याने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील वयोगटातील १०० किलो वजनी गटात आपले कौशल्य आणि दमदार खेळाचे प्रदर्शन;




​संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर 2025 संगमनेर शहराची ओळख बनलेल्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये शाळेचा विद्यार्थी कुमार फरिद समीर शेख याने लक्षवेधी कामगिरी केली आहे.

फरिदने १७ वर्षाखालील वयोगटातील १०० किलो वजनी गटात आपले कौशल्य आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत कुस्तीचे मैदान गाजवले. प्रतिस्पर्ध्याला "धोबी पछाड" डावाने चितपट करत त्याने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे त्याची पुढील विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​                       शाळेच्या यशाचे सूत्र: 

शिक्षण आणि खेळाचा योग्य समतोल
​गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल केवळ दर्जेदार शिक्षण आणि १००% निकालासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. शाळेचे विद्यार्थी शैक्षणिक आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांत आपली छाप सोडत आहेत. फरिदचे हे यश याच धोरणाचे प्रतीक आहे. शाळेच्या इन्चार्ज, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​फरिदच्या या यशाचे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. त्याचे परिश्रम आणि त्याला मिळालेले शाळेचे प्रोत्साहन हे इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्य काय, या मोहिमेत पोलिसांनी किती मुलांना घेतले ताब्यात,वाचा सविस्तर बातमी;




​शिर्डी प्रति: दि 12 सप्टेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शिर्डीमध्ये भीक मागणाऱ्या आणि भाविकांना त्रास देणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून, या मुलांना अशा कामांमध्ये गुंतवणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील या विशेष मोहिमेत १२ मुलांची सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. शिर्डी मंदिर परिसरात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

​                    नेमकी कारवाई काय?

शिर्डीतील साई मंदिर परिसरात अनेक लहान मुले भीक मागताना, तसेच हार, फुले आणि फोटो विकताना आढळून येतात. काही मुले नशेच्या आहारी गेल्याने भाविकांना त्रास देत असल्याच्याही तक्रारी होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले.
​या मोहिमेत पोलिसांनी १२ मुलांना ताब्यात घेतले. त्यांचे जबाब नोंदवून त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार, या मुलांना संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहात पाठवण्यात आले आहे.

​ 

                  पालकांवरही गुन्हा दाखल

या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ मुलांची सुटका करून कारवाई थांबली नाही. मुलांना भीक मागण्यास आणि इतर वस्तू विकण्यास भाग पाडून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आणणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​शिर्डी पोलीस ठाण्यात या १२ मुलांच्या १२ पालकांविरुद्ध बाल न्याय अधिनियम कलम ७५ आणि ७६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत आणि पालकांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

​     भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल

गेल्या काही महिन्यांपासून शिर्डीत अल्पवयीन मुलांकडून लहान-मोठे गुन्हे घडत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे देशा-परदेशातून येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भाविकांचे शिर्डीतील आगमन, वास्तव्य आणि परतीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहतील, असे संकेतही वाघचौरे यांनी दिले आहेत.

श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून कामकाज ठप्प झाल्याने वाहन चालक व मालक वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


श्रीरामपूर / प्रति: जुने अधिकारी बदलून गेल्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी काही काळ लागला. या काळात वाहन चालविण्याचे लायसन, वाहन हस्तांतरण (टी.ओ), वाहनावरील बोजा चढवणे-कमी करणे, वाहन पासिंग आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली. परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
हातावर पोट असलेले वाहनचालक, काहीजण उसनवारी करून वाहने घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर त्यांचे स्वप्न धुळीस मिळते. विशेषतः वाहन परवाना मंजुरीला सहा सहा महिने लागल्याने, नोकरीच्या संधी गमावणारे तरुण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.
यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंता जोशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. संदीप निमसे यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज सुरळीत करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.


संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, ईद-ए-मिलादुन्नबी'च्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून, संगमनेर शहरात 'सर्वधर्म समभाव' जपणाऱ्या संस्थांचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि 'न्यूज एनएमपी मराठी' वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

​सन्मानित संस्था आणि व्यक्ती
​या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगल्या कार्याचा आदर्श घालून देणाऱ्या खालील संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल 'सन्मानचिन्ह' आणि 'कृतज्ञता सन्मानपत्र' देऊन गौरवण्यात आले:
​एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन,एकता नगर सोशल फाउंडेशन, ​ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन,​मोगल पुरा मस्जिद ट्रस्ट
​गवंडी पुरा मस्जिद ट्रस्ट, ​याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डीपी.आय ग्रुप यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. या सर्व संस्था आणि व्यक्तींना मराठी भाषेत पवित्र कुराण, कुराण आणि विज्ञान, तसेच संत-महात्म्यांची पुस्तके भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, जो धार्मिक एकतेचा संदेश देणारा क्षण ठरला.

मांदियाळी मान्यवरांची आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची


​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री. गणी हाजी शेख यांनी भूषवले. तर, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष गुड्डू भाई सैय्यद, रफिक भाई सैय्यद (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), मनीषा ताई पवार (उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा), सामाजिक कार्यकर्त्या तेजश्री बडगुजर आणि लोखंडे मॅडम, नाशिक पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष अकील पटेल, प्रा. शमशुद्दीन ईनामदार आणि माजी नगरसेवक नुरमहंमद यांचा समावेश होता.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शौकत पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजीज भाई ओहरा यांनी केले. या सोहळ्याला संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम बिनसाद, आरोग्य मित्र शाहनवाज शहा, ईनायमत सय्यद, अझहर भाई शेख (कोपरगाव), अफसर तांबोळी,  मुजाहिद पठाण, काँग्रेस कमिटीचे संगमनेर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, जुबेर निसार खान, ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते इम्तियाज शेख, फैसल सय्यद आणि सहसंपादक वसीम सय्यद (घारगाव), शिवसेना शिंदे गटाचे मजहर शेख,गुड्डू इंजिनियर,  कुरेशी जमात अध्यक्ष नदिम कुरैशी आणि अफताब उर्फ पिंटू शेठ नाईकवाडी यांसह अनेक मांन्यवर मंडळीचा समावेश होता.
​या सोहळ्यामुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागून परस्पर सामंजस्य अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, तो धार्मिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला. सदर माहिती ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा बानोबी पठाण (शेख) आणि महासचिव तथा सहसंपादक जमीर शेख (बब्बू पाकीजा) यांनी दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget